नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना सार्वजनिक भाषणांमध्ये दिव्यांग लोकांसाठी वापरल्या जाणार्या शब्दांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हे शब्द अपमानास्पद आहेत. राजकारण्यांनी त्यांचा वापर केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल, असा इशाराही आयोगाने दिला आहे.
निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेत सर्व राजकीय पक्षांना दिव्यांगांसाठी भाषणांतून ‘अपमानास्पद शब्द’ वापरू नयेत, असे निर्देश दिले आहेत. याशिवाय, पक्षांच्या वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भाषणे इत्यादी अधिक सुलभ आणि दिव्यांगांसाठी सुलभ बनविण्यास सांगण्यात आले आहे. या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले गेले तर दोषीला ‘दिव्यांग व्यक्तींचे हक्क कायदा, २०१६’ च्या कलम ९२ अंतर्गत ५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
मुका, मतिमंद, वेडा, आंधळा, काना, बहिरा, लंगडा, अशक्त, अपंग इत्यादी शब्द वापरणे टाळावेत. अशा पारिभाषिक शब्दांचा वापर म्हणजे दिव्यांगांचा अपमान असा अर्थ लावला जाऊ शकतो, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. राजकीय पक्षांना सार्वजनिक भाषणे, मोहिमा आणि इतर उपक्रम दिव्यांग व्यक्तींना सोयीचे होतील, अशाप्रकारे आयोजित करावेत. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी त्यांच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दिव्यांगांना सहज हाताळता येतील अशा प्रकारे त्याची रचना करावी. पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिव्यांगांना कशी सेवा द्यावी, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच पक्षाचे कार्यकर्ते आणि सदस्य म्हणून दिव्यांगांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित केला पाहिजे. सर्व प्रचार सामग्रीमध्ये सक्षम किंवा भेदभाव करणारी भाषा वापरली जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी अंतर्गत पुनरावलोकन करावे लागेल. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, सर्व पक्ष दिव्यांग व्यक्तींच्या मानवी समानता, सहभाग, प्रतिष्ठा आणि स्वायत्ततेचा आदर करतील अशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे.