दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना जामीन मिळणार ?

Edited by: ब्युरो
Published on: March 22, 2024 06:11 AM
views 302  views

दिल्ली : मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. दरम्यान, केजरीवाल यांनी ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, या याचिकेवर आज शुक्रवारी सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि बेला त्रिवेदी यांच्या विशेष पीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी उल्लेख करताना सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, “जर ही प्रक्रिया सुरू राहिली, तर पहिले मतदान होण्यापूर्वी बरेच ज्येष्ठ नेते तुरुंगात जातील. कृपया याकडे लक्ष द्यावे.” त्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सिंघवी यांना सांगितले की, केजरीवाल यांच्या याचिकेवरील सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या पीठासमोर होईल.