नवी दिल्ली : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातील कराची इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. कुख्यात डॉन दाऊद गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील कराचीमध्ये वास्तव्याला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार दाऊदची प्रकृती गंभीर असून त्याच्यार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत दाऊदचा समावेश आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात तो वॉन्टेड आहे. दरम्यान दाऊद इब्राहिमला कराचीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दाऊदला कोणी विष दिलं ? याबाबतही माहिती उपलब्ध झालेली नाही. सोशल मीडियावर दाऊदवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याची बातमी व्हायरल झाली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे. दाऊद इब्राहिमचा जन्म मुंबईत झाला. त्याचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. लहानपणापासूनच दाऊद मारामारी, खंडणी, चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होता.