पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं आज पहाटे निधन झालं. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये दाखल झाले. पार्थिवाला यू. एन. मेहता रुग्णालयातून मोदींच्या गांधीनगरमधील घरी आणण्यात आलं होतं. मोदींनी घरीच आईच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर रुग्णवाहिकेमधून पार्थिव स्मशानभूमीमध्ये अंतिमसंस्कारासाठी नेताना मोदींनी रुग्णवाहिकेमधूनच प्रवास केला. रुग्णवाहिकेपर्यंत पार्थिव नेताना मोदींनीच पार्थिवाला खांदा दिला.
याच वर्षी 18 जून रोजी हीराबेन यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम... मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध "शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम...मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जीवन समाहित रहा है। असे ट्वीट करीत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.
हीराबेन यांची तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. हीराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांचे प्रधान सचिव के. कैलासनाथन रुग्णालयात गेले होते.
त्यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना भेटून हीराबेन यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. तसेच त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही अहमदाबादला आले होते. त्यांनी आपल्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच आईसोबत थोडावेळ घालवला होता.
हीराबेन यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे हीराबेन यांची प्रकृती अधिकच खालावली. उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली.