मालवण : भारतीय नौदलाच्या जहाजावर पहिल्या कमांडिंग ऑफिसर म्हणून निवड करण्यात आलेल्या लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्थळी नौदल दिननिमित्त तारकर्ली येथे आल्या आहेत. रियर अॅडमिरल प्रवीण नायर (फ्लॅग ऑफिसर कमांडींग वेस्टन फ्लिट) यांच्या हस्ते प्रेरणा देवस्थळी यांना कमांडिंग ऑफिस म्हणून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
नौदल दिनापूर्वी, भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यांची वॉटरजेट एफएससी, आय एन एस त्रिंकटचे कमांडिंग ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्या यापूर्वी फर्स्ट लेफ्टनंट म्हणून आयएनएस चेन्नई वर कार्यरत होत्या. भारतीय नौदलात युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या देवस्थळी या पहिल्या भारतीय नौदलाच्या महिला अधिकारी असतील. नौदलातील महिला कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या व श्रेणी देण्याच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयएनएस त्रिंकट हे भारतीय नौदलाचे जलद हल्ला करणारे क्राफ्ट आहे. आणि अंदमान आणि निकोबार बेटांमधील त्रिंकट बेटावरून त्याचे नाव देण्यात आले आहे. नौदलाने आपली सेवा नैतिकता आणि मूल्ये जपत सर्व श्रेणींमध्ये समानतेला प्रोत्साहन दिले आहे.