नवी दिल्ली : छठपूजा हा मुख्यत: बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहे. या राज्यांतील स्थलांतरित नागरिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि ही राज्ये निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्णही आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने या नागरिकांसाठी छठपुजेसाठी विशेष व्यवस्था केली आहे. भाविकांना सूर्यदेवाची प्रार्थना करता यावी म्हणून घाट उभारले जात आहेत. रविवारी हा उत्सव साजरा होणार आहे.
यानिमित्त रेल्वे विभागाकडून विशेष रेल्वे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिल्लीमधील आम आदमी पार्टीचे सरकार आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यात छठपूजेच्या व्यवस्थेवरून स्पर्धा सुरू आहे. शाब्दिक युद्धही रंगले आहे. केजरीवाल सरकारने छठपूजेसाठी 1100 ठिकाणी व्यवस्था केलेली आहे.
बिहारमधील नितीश कुमार सरकारनेही छठ पुजेसाठी राज्यात येणाऱ्या त्यांच्या नागरिकांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे उपलब्ध करून देण्याची रेल्वे मंत्रालयाला विनंती केली आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एएनआयला माहिती दिली की, या उत्सवासाठी 250 विशेष रेल्वे आणि 1 लाख 40 हजार बर्थची व्यवस्था केली जाईल. वैष्णव यांनी बुधवारी ट्वीट केले की, एकूण 36,59,000 अतिरिक्त बर्थ छठपूजा, दिवाळी आणि उत्सवांसाठी 2 हजार 614 विशेष रेल्वे चालवून सणासुदीच्या काळात उपलब्ध करून दिले आहेत.