
नवी दिल्ली : काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रुपाने नवा अध्यक्ष मिळाला आहे. 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष निवडून आला आहे. शशी थरूर यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेल्या 17 ऑक्टोबरला मतदान झाल्यानंतर आता आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली. काँग्रेस मुख्यालयात सकाळी दहाच्या सुमारास मतमोजणी सुरू झाली. आधीपासून खरगे यांनी आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम राहिली आणि विजयामध्ये रुपांतरीत झाली. खर्गे यांना आतापर्यंत 7897 मते मिळाली आहेत. तर थरूर यांना 1072 मते मिळाली. थरूर यांनी आपला पराभव स्वीकारला असून काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे विरुद्ध शशी थरूर असा सामना रंगला होता. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचा पहिल्यापासून वरचष्मा होता. शशी थरूर यांच्या विरुद्ध मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव फिक्स होण्यामागे पाहिलं कारण साहजिकच त्यांची गांधी कुटुंबाशी असलेली एकनिष्ठता आहे. मल्लिकार्जुन खर्गे १९७२ पासून काँग्रेमध्येच आहेत. खर्गे गांधी यांचे विश्वासू असल्याचं उदाहरण म्हणजे यावर्षी पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रासाठी काँग्रेसचे निरीक्षक म्हणून खर्गे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
दुसरं म्हणजे ५ राज्यांच्या निवडणुकीत जेव्हा काँग्रेसचा पराभव झाला तेव्हा खर्गे यांनी सोनिया गांधींची बाजू मांडत "पराभवासाठी प्रत्येक राज्यातील नेता आणि खासदार जबाबदार आहेत, गांधी कुटुंब नाही" असं वक्तव्य केलं होतं. तर दुसरं कारण म्हणजे त्यांचं पक्षातील बळ.
खर्गे कर्नाटकातून राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत आणि १६ फेब्रुवारी २०२१ पासून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. २०१४-२०१९ दरम्यान लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते होते. माजी रेल्वेमंत्री आणि कामगार आणि रोजगार मंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. १९७२ ते २०१४ दरम्यान सलग ११ वेळा निवडणुका जिंकण्याचा विक्रम त्यांनी केलाय. शिवाय कर्नाटकच्या राजकारणात तर एक मोठा चेहरा म्हणून खर्गे यांना ओळखलं जातं. २००५ साली त्यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर लगेचच झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि जेडीएसच्या तुलनेत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आणि कर्नाटकच्या ग्रामीण भागात काँग्रेसचा बोलबाला झाला. अखेरीस आता खर्गे यांच्या रुपाने काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळाले आहेत.














