ब्युरो न्युज : आर्थिक मंदीचा फटका बसत असल्याने खर्च कमी करण्यासाठी अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. काही कंपन्यांनी दोन वेळा कर्मचारी कपात केली आहे. Google मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात टाळेबंदी करण्यात आली होती.
गुगलने १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गुगलच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयाच्या विरोधात लंडनमधील गुगलच्या कार्यालयातील शेकडो कर्मचाऱ्यांनी वॉकआउट केले. या वर्षाच्या सुरुवातीपासून तब्बल २,९०,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. संपूर्ण टेक क्षेत्रामध्येच नोकर कपातीची लाट पसरली आहे.
गुगलच्या लंडन कर्मचार्यांचे प्रतिनिधित्व करणार्या ट्रेड युनियन युनाइटने कर्मचार्यांच्या चिंतेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युनाइटचे प्रादेशिक अधिकारी मॅट व्हेली म्हणाले की , Google ला याबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. जोपर्यंत Google त्यांच्या कामगारांना सन्मानाने वागवत नाही तोपर्यंत ते आणि युनाइट मागे हटणार नाही.
गुगलच्या एका कर्मचाऱ्याशी झालेल्या संभाषणाचा हवाला या अहवालात देण्यात आला आहे. व्यवस्थापनाशी झालेले संभाषण ‘अत्यंत निराशाजनक’ असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. कंपनीने आमच्या चिंतेकडे दुर्लक्ष केल्याचेही कर्मचाऱ्याने सांगितले. यापूर्वी गुगलच्या झुरिच कार्यालयातील कर्मचार्यांनी कंपनीच्या नोकऱ्या कपातीच्या प्रस्तावाचा निषेध करत अशाच प्रकारे वॉकआउट केले होते. गुगलचे यूकेमध्ये ५,००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. गुगलने जानेवारीमध्ये १२,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. सुंदर पिचाई यांच्या घोषणेनंतर अमेरिकेत छाटणीचा टप्पा सुरू झाला. सर्च इंजिन कंपनी गुगलने केलेल्या घोषणेनंतर सुमारे ४५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.