मुंबई : मुंबईत डीआरआयच्या पथकाने सोने तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणली आहे.या कारवाईत डीआरआयने वडील आणि मुलाला अटक केली आहे.त्यांच्याकडून जवळपास 23 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे सोने व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे. या पिता-पुत्राने तस्करी करुन इतके सोने मिळवले कसे? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. धर्मराज भोसले(52) आणि सूरज भोसले या पिता, पुत्रावर कारवाई करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने दोघांना कोर्टासमोर हजर केले. त्यांना डीआरआयच्या कोठडीत पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई डीआरआयच्या पथकाने परवा झवेरी बाजार येथील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा टाकला होता. यात 23 कोटी रुपयांचे जवळपास 37 किलो सोन्याची तस्करी प्रकरणात धर्मराज भोसले आणि सूरज भोसले या सोने व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. गुप्तचर महसूल संचालनालयाने सोने तस्करी रॅकेटचा भाग असल्याच्या आरोपावरून पिता-पुत्राला अटक केली आहे. ही अटक कस्टम कायद्यान्वये करण्यात आली आहे.
मागील महिन्यात डीआरआयच्या पथकाने एका प्रशांत माईणकर नामक व्यक्तीला अटक केली होती. तो अखाती देशातून आलेले सोने वितळविण्याचे काम करत होता. काळबादेवी येथे ही सुविधा त्याला भोसले यांनी उपलब्ध करुन दिली होती. जानेवारी महिन्यात 3.5 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीच्या तपास डीआरआय करत होते.