BIG BREAKING | तब्बल 10 कोटी 74 लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त

मुख्य सूत्रधार कुडाळचा
Edited by: भरत केसरकर
Published on: May 28, 2023 09:36 AM
views 353  views

आजरा : आंबोली-आजरा मार्गावर गवसे जवळ तब्बल १० किलो ६८८ ग्रॅम वजनाची सुमारे १० कोटी ७४ लाख रूपयांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली. या तस्करी प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य सूत्रधारासह अन्य चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आजरा पोलीस व वनविभागाने शनिवारी उशिरा संयुक्तरित्या ही कारवाई केली. कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली असून या प्रकारामुळे आजरा तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही खळबळ माजली आहे.

      दरम्यान, या तस्करी प्रकरणी शिवम किरण शिंदे (२३, रा. अभिनव नगर नं. २, कुडाळ) या मुख्य सुत्रधारासह अकबर याकूब शेख ( ५१, रा. पिंगोळी, मुस्लिमवाडी, ता कुडाळ), गौरव गिरीधर केरवडेकर (वय ३३, रा. केरवडे तर्फ माणगाव, ता. कुडाळ), इरफान इसाक माणियार (वय ३६, रा. पोष्ट ऑफीस गणेश नगर, कुडाळ), फिरोज भाऊद्दीन खॉजा (वय ५३, रा. कोलगाव, ता. सावंतवाडी) यांना पोलीसांनी ताब्यांत घेतले आहे. तसेच या प्रकरणी वापरण्यात आलेली एक चारचाकी व एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आजरा मार्गे व्हेल माशाची उलटीची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती आजर्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षक पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हारूगडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांनी पोलीसांचे एक पथक तयार केले. या पथकाने शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून आजरा-आंबोली मार्गावर साफळा रचला.  आंबोलीपर्यंत तसेच परिसरातील जंगलभाग, धरणभागात गस्त सुरू केली. त्याचबरोबर घाटकरवाडी (ता. आजरा) येथे नाकाबंदी सुरू करून कोकणातून येणार्‍या दुचाकी व चारचाकी गाड्यांची तपासणी सुरू केली.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गवसे जवळ टाटा सफारी (एमएच ०१ बीसी ०५९०) या गाडीची तपासणी केली. यात असणार्‍या तिघाजणांकडे पोलीसांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू केली. तसेच त्यांचे मोबाईल तपासण्यात आले. त्यांचे व्हेल माशाच्या उलटी तस्करीशी लागेबंध असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचला.

यावेळी मोटारसायकलवरून (एमएच ०७ एडी ७७५८) येणार्‍या दोघांकडे काळ्या सॅकमध्ये व्हेल माशाची उलटी असल्याचे आढळून आले. त्यांना त्वरीत मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. शासकीय पंच व वनविभागाचे दोन अधिकारी यांच्यासमवेत तस्करीच्या मालाची पहाणी करून ती व्हेल माशाची उलटी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. व्हेल माशाच्या उलटीचे वजन १० किलो ६८८ ग्रॅम आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १० कोटी ७४ लाख आहे. पोलीस पथकात सपोनि हारूगडे, उपनिरीक्षक जाधव यांच्यासह दत्तात्रय शिंदे, प्रशांत पाटील, विशाल कांबळे, विकास कांबळे, प्रदीप देवार्डे यांचा समावेश होता. परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके यांच्या मार्गदर्शनाखाली बाळेश न्हावी व गुरूनाथ नावगेकर हे वनकर्मचारी उपस्थित होते.