ब्युरो न्युज : शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातीत कोरोना काळात घालण्यात आलेली हार, फूल, प्रसादावरील बंदी हटवली जाणार आहे. साईसंस्थांच्या तदर्थ समितीने बंदी हटवण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवल्याने लाखो साईभक्तांना लवकरच साईबाबा मंदिरात हार फुले वाहता येणार आहेत.
समितीच्या अहवालानुसार, साईसंस्थानच्या तदर्थ समितीने ही बंदी हटवण्याचा निर्णय घेतला असून निर्णयाच्या न्यायालयाच्या मान्यतेसाठी दिवाणी अर्ज दाखल केलाय.
साई मंदिरातील ही बंदी उठली तर शिर्डीतील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिर्डीतील शेकडो व्यावसायिक आणि परिसरात 384 हेक्टर क्षेत्रावर फुलशेती केली जाते.
आता साई संस्थान मार्फत भाविकांना रास्त भावात फुलांची विक्री केली जाणार आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांकडून साईभक्तांना फुले उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे साईभक्तांची लूट थांबून शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.
कोरोनामुळे शिर्डीच्या साईमंदिरात हार, फुले आणि प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. या निर्णयाने शिर्डीच्या शेकडो फुलशेती करणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.
बंदी उठवावी या मागणीसाठी आठ महिन्यांपूर्वी साईमंदिराच्या प्रवेशद्वारावर शेतकरी आणि व्यावसायिकांनी आंदोलन केले होते. महसूलमंत्री व शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती.
दरम्यान, या समितीच्या अहवालानुसार, तदर्थ समितीने ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून न्यायालयाच्या मान्यतेसाठी दिवाणी अर्ज दाखल केला आहे.