सिंधुदुर्ग : नीती आयोग व अटल इनोव्हेशन मिशन आयोजित अटल मॅरेथॉनमध्ये विश्वजीत परीट या विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळवलंय. या मॅरेथॉन मधून देशातून चारशे कल्पना निवडण्यात आल्या होत्या. तर महाराष्ट्रातून आठ कल्पना निवडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये विश्वजीतचा समावेश होता. विश्वजीत हा कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेजचा विद्यार्थी आहे.
त्यानंतर बारामती या ठिकाणी SIP स्टुडन्ट इंटरशिप प्रोग्रम डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आला होता व तिथे पुनर्मूल्यमापन होऊन 400 संकल्पनेंमधून 100 प्रकल्प निवडण्यात आले. त्यामध्ये राज्यात २रा तर देशात १२वा म्हणून विश्वजीत परीटच्या प्रकल्पाची निवड होऊन दिल्ली या ठिकाणी SEP ( स्टुडन्ट इंटरप्रनर्शिप प्रोग्रॅम )साठी प्रोजेक्टची निवड झाली आहे.
"कारखान्यांच्या परिसरातील होणाऱ्या हवेच्या प्रदूषणावरील उपाय" अशा संकल्पनेवर आधारित विश्वजीत चा प्रोजेक्ट आहे. धुराड्यातून बाहेर पडणाऱ्या धुरातील कार्बनचे कण पाण्यामार्फत गोळा करण्याची संकल्पना विश्वजीतने आपल्या प्रोजेक्ट द्वारे मांडली आहे. या प्रकल्पासाठी कुडाळ हायस्कूलचे शिक्षक श्री योगानंद सामंत, एस आर एम कॉलेजचे प्राध्यापक कानशिडे सर व अटल मेंटॉर रश्मी परब यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेजच्या अटल लॅबचे हे यश कुडाळ हायस्कूलच्या गौरव गाथेत मानाचा तुरा ठरणारे आहे. या यशाबद्दल सर्व संस्था चालक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य आणि विद्यार्थ्यांनी विश्वजीतचे अभिनंदन केले आहे. ज्युनिअर विभागाकडील इतिहासाचे शिक्षक अविनाश परीट यांचा विश्वजीत हा मुलगा असून परीट कुटुंबाचेही सर्वत्र कौतुक होत आहे.