पुणे : राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्याचे पाहायला मिळत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शिवसेनेप्रमाणे फूट पडली आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले. ज्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बरीचशी जुनी नेतेमंडळी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गोटात म्हणजेच अजित पवार यांच्या गटात गेली. यावेळी खूप कमी लोक हे शरद पवार यांच्यासोबत राहिले. पण यावेळी शरद पवारांच्या नातूने म्हणजेच रोहित पवारांनी आजोबांना पाठिंबा दिला. त्यानंतर बऱ्याचशा बैठकांमध्ये रोहित पवार हे शरद पवारांसोबत सावलीप्रमाणे उभे राहिलेले पाहायला मिळाले. या नातवानंतर आता शरद पवार यांचा आणखी एक नातू राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.