नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी लहान बाळासह दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा १३ वर गेला आहे.
अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते. अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती. पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली. अपघातानंतर बसने पेट घेतला. गाठ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरश कोळसा झाला. बसमध्ये २० ते २५ प्रवासी असल्याचा अंदाज आहे. काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मयत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटीलिंक बसमधून हलविण्यात आले. आगीत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. बसमधील ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले.या दुर्घटनेत १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान डोईफोडे यांनी दिली.
याशिवाय बसला आग लागल्याने अनेकजण गंभीररित्या भाजले गेल्याने, त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, मदतकार्य सुरू आहे.