राजकारणातील एक ठाम आवाज हरपला

गोवा,मेघालय ,जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधान
Edited by: ब्युरो
Published on: August 05, 2025 15:55 PM
views 17  views

ब्युरो न्यूज : जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ राजकारणी सत्यपाल मलिक यांचे आज सकाळी दिल्लीत निधन झाले. ते काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे खासगी सचिव के. एस. राणा यांनी दिली आहे.

सत्यपाल मलिक हे २०१८ ते २०१९ या कालावधीत जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते. त्यांच्या कार्यकाळातच ५ऑगस्ट २०१९  रोजी केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांची नोव्हेंबर २०१९  ते ऑक्टोबर २०२० दरम्यान गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. यानंतरऑक्टोबर २०२० ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत त्यांनी मेघालयचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.

राजकीय वाटचाल – विद्यार्थीदशेपासून राज्यपालपदापर्यंत : 

सत्यपाल मलिक यांनी आपली राजकीय कारकीर्द १९६८-६९ मध्ये विद्यार्थी नेता म्हणून सुरू केली होती. त्यानंतर १९७४ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील बागपत येथून विधानसभा निवडणूक जिंकत विधिमंडळात प्रवेश केला. चौधरी चरणसिंह यांच्याशी त्यांची जवळीक होती आणि ते पुढे लोक दलचे महासचिवही झाले.१९८० मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. पुढे त्यांनी १९८४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि १९८६ मध्ये पुन्हा राज्यसभेत गेले. मात्र बोफोर्स प्रकरणानंतर त्यांनी काँग्रेस सोडून जनता दलमध्ये प्रवेश केला.१९८९ मध्ये जनता दलच्या तिकिटावर अलीगढमधून लोकसभेवर निवडून आले आणि केंद्र सरकारमध्ये संसदीय कामकाज व पर्यटन राज्यमंत्री म्हणून कार्य केले.

कृषी कायदे आणि पुलवामा हल्ल्यावर खुलेपणाने भूमिका : 

सत्यपाल मलिक यांनी कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला होता. राज्यपाल असतानाही त्यांनी केंद्र सरकारवर वेळोवेळी टीका केली. पुलवामा हल्ल्याबाबतही त्यांनी काही ठळक वक्तव्ये केली होती, ज्यामुळे ते चर्चेत आले.

बहु-पक्षीय अनुभव असलेले स्पष्टवक्ता नेते: 

मलिक यांनी आपल्या राजकीय जीवनात लोक दल, काँग्रेस, जनता दल आणि भाजप अशा विविध पक्षांमध्ये कार्य केले. मात्र कोणत्याही पक्षात असले तरी मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. त्यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणाने एक अनुभवी आणि स्पष्टवक्ता नेते गमावले आहेत.