
सावंतवाडी : आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा होत आहे. हा दिवस प्रत्येक स्त्रीसाठी महत्त्वाचा आहे. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ अर्थात 'आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. आज देशभरात ठिकठिकाणी महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. याधर्तीवर महिला दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केले आहे. सर्च इंजिन गुगलने हे doodle बनवून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जाणून घ्या गुगलच्या या खास डूडलबद्दल…
गुगल डूडलने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एकमेकांना पाठिंबा देणाऱ्या महिलांवर विशेष लक्ष्य केंद्रित केले आहे. प्रत्येक “GOOGLE” अक्षरातील शब्दचित्रे अनेक क्षेत्रांपैकी फक्त काही महत्वाच्या क्षेत्रांवर प्रकाश टाकतात. विशेषतः जगभरातील स्त्रिया प्रगतीसाठी आणि एकमेकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी एकमेकांना मदत करतात, असे यात ठळक दिसून येते. त्याचप्रमाणे आजचे हे गूगल डूडल अलिसा विनान्स या डूडल आर्टिस्टने रेखाटले आहे. या अॅनिमेटेड ग्राफिकमध्ये महिलांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दाखविण्यात आले आहे. समाजात एक नेता, वैज्ञानिक, आई, अन्यायाविरुद्ध झटणारी, डॉक्टर स्त्री, अशा अनेक भूमिकेत ‘ती’ने आपले नाव लौकिक केले आहे.
मुख्यतः प्रभावशाली पदांवर असलेल्या महिला त्यांच्या हक्कांसाठी, शोध घेण्यासाठी, शिकण्यासाठी, रॅलीसाठी एकत्र येतात, अशा सर्व महिलांचे Google डूडलच्या पृष्ठावर वर्णन केले आहे. महिलांच्या कर्तृत्वाची ओळख पटवण्यासाठी, महिलांच्या समानतेबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी, त्वरीत लैंगिक समानतेसाठी लॉबी आणि महिला-केंद्रित धर्मादाय संस्थांसाठी निधी उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात आयोजित केला जातो.














