मोरबी (गुजरात) : येथील मच्छू नदीवर असलेला १०० वर्षे जुना झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान ६० जणांचा मृत्यू झाला. पूल पडल्यानंतर अनेक जण नदीत वाहून गेल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
रविवारी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास ही घटना घडली. या भागात येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला हा पूल सहा महिने नूतनीकरणासाठी बंद होता. एका खासगी कंत्राटदाराने डागडुजी केल्यानंतर गुजराती नववर्षदिनी, २६ ऑक्टोबरला पूल पुन्हा खुला करण्यात आला होता. मात्र हा पूल वापरयोग्य असल्याचे प्रमाणपत्र पालिकेने दिले नव्हते, असे समजते. दिवाळीची सुट्टी आणि रविवार असल्यामुळे पुलावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. यात महिला आणि मुलांची संख्या जास्त असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. गर्दीमुळे वजन न पेलल्यामुळे पूल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलासह स्थानिक बचावपथकांनी बोटींद्वारे नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) तीन तुकडय़ा गांधीनगर आणि बडोदा येथून घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून बचावकार्यात हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात आहे. आतापर्यंत ४० ते ५० जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती आहे. या घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि बचावकार्याचा आढावा घेतला. पीडितांना तातडीने मदत पोहोचली पाहिजे, याची काळजी घेण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.
मृतांच्या नातलगांना पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीमधून दोन लाखांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातलगांना चार लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करतानाच पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बचावकार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तर भाकप खासदार बिनोय विस्वम यांनी या दुर्घटनेला गुजरातचे भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच पीडितांना जाहीर झालेल्या मदतीत वाढ करण्याची मागणीही त्यांनी केला.