पुरग्रस्थ धरालीतून १९० जणांची सुटका ; जीवघेणा संघर्ष सुरूच !

महाराष्ट्र जळगावातील १६ जणांचा थांगपत्ता नाही
Edited by: ब्युरो
Published on: August 07, 2025 10:46 AM
views 39  views

ब्युरो न्यूज : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ५ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या भीषण ढगफुटी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित हानी तसेच मालमत्तेची हानी झाली आहे. खीरगंगा नदीला आलेल्या पुरामुळे समुद्रसपाटीपासून ८,६०० फूट उंचीवर असलेल्या धराली गावातील अनेक हॉटेल्स, निवासी इमारतींना फटका बसला असून, या घटनेत किमान चार जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्यात गती दिली आहे . बुधवारी ६ ऑगस्ट पर्यंत १९० नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून यात दोन मृतदेह सापडले, तर १५ जण अद्याप बेपत्ता असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. भारतीय लष्कर, हवाई दल, ITBP, NDRF, SDRF आणि BRO यांचे संयुक्त बचावपथक रात्रंदिवस काम करत आहेत.

विशेष बाब म्हणजे, या दुर्घटनेत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील १६ जण बेपत्ता झाले आहेत. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, “उत्तरकाशीमध्ये असलेल्या १९ जळगावकरांपैकी फक्त ३ जणांशी संपर्क झाला आहे, उर्वरित १६ जणांचा शोध सुरु आहे.” महाराष्ट्र सरकार व उत्तराखंड प्रशासन यांच्यात समन्वय साधून शोधमोहीम राबवण्यात येत आहे.दरम्यान, उत्तरकाशीतील मनिरी येथे रस्त्याचा भाग कोसळला, आणि ११ लष्करी जवान जखमी झाले, ज्यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.भारतीय हवामान विभागाने उत्तराखंडसाठी रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. परिणामी, ७ ऑगस्ट रोजी उत्तरकाशीमधील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सीमा रस्ते संघटना (BRO) उत्तरकाशी-गंगोत्री व जोशीमठ-मलारी या दोन्ही महत्त्वाच्या मार्गांवर संपर्क बहाल करण्यासाठी यंत्रसामग्रीसह प्रयत्नशील आहे. धाराली परिसरात ३०० मीटर गाळ काढणे सुरू आहे, तसेच अनेक पूल, रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या संपूर्ण परिस्थितीवर केंद्र सरकारकडून लक्ष ठेवण्यात येत असून,पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री धामी यांच्याशी चर्चा करून केंद्राच्या मदतीचे आश्वासन दिलेआहे.बचाव कार्य अजूनही सुरु आहे आणि प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.