ऑफर्सच्या रिल्स बघून भुलल्या, अन् बेशु्द्ध पडल्या..!

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 19, 2025 22:21 PM
views 1154  views

कोल्हापूर: सोशल मीडियावरील रिल्स बघून भुलल्या आणि बेशुद्ध पडल्या अशीच  काही अवस्था कोल्हापूर मधील महिलांची झालेली आहे. याचं झालं असं कोल्हापूर शहरातील कलेक्टर ऑफिस येथील बसंत बहार  रोडवर एक नामांकित कपड्याचे शोरूम आज सुरू झालं. या शोरूमच्या उद्घाटना दिवशी शोरूमच्या मालकाने शंभर रुपयाला ड्रेस अशी अभिनव संकल्पना राबविली. याची जय्यत तयारी करून काही रिल्स स्टारना  याचे रिल्सही बनवायला लावले आणि याचं जोरदार प्रमोशन केलं गेलं.  यामुळे हे रिल्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊन त्या दुकानाची चांगलीच प्रसिद्धी झाली. आज-काल जाहिरातीचा हा नवा फंडा उदयास आला असून जाहिरातीच एक सक्षम माध्यम म्हणून अशा पद्धतीच्या नव्या आयडिया राबविल्या जात आहेत. 

वास्तविक एक दोन दिवसासाठी ग्राहकांना भुरळ पाडून असे स्वस्तात मस्त कपडे दिले जातात आणि त्या बदल्यात दुकानाची फुकट प्रसिद्धी केली जाते. ग्राहकही हजारोंच्या संख्येने अशा दुकानांमध्ये जातात आणि खरेदीच्या नादात अक्षरशा स्वतःचा जीव धोक्यात घालून घेतात. वास्तविक जर सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांमध्ये कपड्यांचे हे दर परवडतात तर मग नंतर या कपड्यांचे दर कसे काय वाढले जातात..? हा प्रश्न मात्र आजपर्यंत कोणत्याही ग्राहकाला पडलेला नाहीये.  या शोरुमच्या ऑफरला भुलून कोल्हापूर शहरातीलच नव्हे तर ग्रामिण, तसेच पर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर महिला आल्या होत्या. ही ऑफर फक्त एक दिवसासाठीच असल्याने अशा पद्धतीचा गंभीर प्रसंग तिथे निर्माण झाला. 

ऑफरच्या नादात मात्र हजारो महिलांनी आज त्या शोरूममध्ये जाऊन आपला जीव धोक्यात घातला. वास्तविक अशा पद्धतीची लोकांना भुरळ घालणारी ऑफर काढताना शोरूम मालकाने पोलीस प्रशासन अथवा कोणत्याही शासकीय यंत्रणेला गर्दीची कल्पना दिली होती का? याचा जाब आता प्रशासनाने विचारणे गरजेचे आहे.  तसेच अशा पद्धतीची गर्दी होऊन जर कोणतीही दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी नेमकी कोण घेणार..? हा ही प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

त्यामुळे इथून पुढे अशा भुरळ पाडणाऱ्या आणि आकर्षक योजनांकडे लोकांनी कितपत लक्ष द्यावं तसेच सोशल मीडियावरील रिल्स बघून तिथं कितपत जावं हा आता सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. येणाऱ्या सणावारांच्या काळामध्ये आता अनेक विक्रेते अशा पद्धतीची संकल्पना पुढे आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इथून पुढे अशा योजनांवर प्रशासनानं कडक लक्ष देऊन योग्य ती कारवाही करावी. तसेच सुरक्षा व्यवस्थाही पुरवावी. अशी मागणी सर्वसामान्य वर्गातून व्यक्त होत आहे. आता यावर पोलिस काय कारवाई करणार का ? की त्या दुकान मालकाला समज  देऊन सोडून देणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.