
दोडामार्ग : महाभारतातील अर्जुनाप्रमाणे मी धनुरधारी बनून नथीतून तिरमारून अचूक वेध घेणार असून, दोडामार्ग पंचायत समितीवर अपक्षांचाच झेंडा फडकणार, असा ठाम विश्वास झरेबांबर पंचायत समिती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वृषाली गवस यांचे पती प्रकाश गवस यांनी व्यक्त केला.
झरेबांबर पंचायत समिती मतदारसंघात अपक्ष उमेदवार वृषाली गवस यांचा झंझावाती प्रचार सध्या सुरू आहे. प्रचारादरम्यान बोलताना प्रकाश गवस यांनी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र विकास सोसायटी स्थापन करण्यात येणार असून, त्याचे कामही सुरू झाल्याची माहिती दिली. या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शून्य अथवा अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या विकासात्मक उपक्रमांमुळे माटणे जिल्हा परिषद तसेच माटणे आणि झरेबांबर पंचायत समिती मतदारसंघातील आमचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वासही प्रकाश गवस यांनी व्यक्त केला.










