
कुडाळ : जिल्हा बँक भरती रखडलेली, रत्नसिंधूसारख्या योजना बंद, विकासाच्या केवळ घोषणा आणि सत्ताधाऱ्यांचे अपयश लपवण्यासाठी सुरू असलेली पक्षप्रवेशांची खेळी—या सर्व मुद्द्यांवर माजी आमदार वैभव नाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महायुती सरकारचा कारभार उघड करत, निवडणुकांच्या तोंडावर जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप केला.
पत्रकार परिषदेत अधिक बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांनी आश्वासनांपलीकडे काहीही केले नसल्याचा आरोप केला. जिल्हा बँक भरती प्रक्रिया अद्यापही रखडलेली असून तरुणांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभदायक असलेली रत्नसिंधु योजना बंद करण्यात आली असून कृषी, दशावतारी, पशुपालन यांसारख्या महत्त्वाच्या अनेक योजना रखडल्या आहेत. या योजनांचा थेट फटका सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसेच कलाकारांना बसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सतीश सावंत यांच्या विकासाची व्याख्या नेमकी काय आहे, हा संशोधनाचा विषय असल्याची टीका करत नाईक यांनी विकासाच्या केवळ घोषणा केल्या जात असल्याचा आरोप केला. तसेच शिंदे गटातीलच अनेक कार्यकर्ते निधीच मिळालेला नाही, असे मला सांगतात, असा दावाही त्यांनी केला.
महायुतीकडून तेच तेच उमेदवार पुन्हा उभे करण्यात आले असून जनतेने यावेळी नव्या उमेदवारांना संधी द्यावी, असे भावनिक आवाहन वैभव नाईक यांनी केले. जिल्हा परिषदेतील ठेकेदारी थांबवण्यासाठी जनतेने एकजुटीने साथ द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. अनेक पक्षप्रवेश झाले असले तरी शिवसेना उबाठा आजही ताकदीने लढत असल्याचे सांगत, पक्ष सोडून गेलेल्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही नाईक यांनी दिला.










