निलेश राणेंनी बारामतीत घेतली पवार कुटुंबीयांची भेट

Edited by: संदीप देसाई
Published on: January 29, 2026 21:47 PM
views 473  views

सिंधुदुर्ग: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, नारायण राणे यांचेजवळचे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर असंख्य कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेच्या मनातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

स्व. अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर कोकणचे सुपुत्र आणि आमदार निलेशजी राणे यांनी बारामती येथील पवार कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचे सांत्वन केले.

राणे परिवार आणि पवार परिवार यांचे नाते हे केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता आपुलकीचे, जिव्हाळ्याचे आणि अतूट होते. हे नाते शब्दांत मांडणे अशक्य असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त करण्यात आली.

स्व. अजितदादा पवार हे केवळ एक प्रभावी नेते नव्हते, तर दिवसरात्र जनतेसाठी झटणारे, कामातून स्वतःची ओळख निर्माण करणारे आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबीयांसह राज्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी पवार कुटुंबीयांना धीर दिला.