
नवी दिल्ली : देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री. राजीव रंजन सिंह (ललन सिंह) यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक झाली . या बैठकीला महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री. नितेश राणे उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विकासाबाबत आणि कोळंबी उत्पादकांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत प्रामुख्याने एसपीएफ (SPF) कोळंबी ब्रूडस्टॉक, पीपीएल (Post Larvae) आणि जिवंत खाद्य आयात करण्याशी संबंधित विविध कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा केली. कोळंबी उत्पादनात शाश्वत वाढ साध्य करतानाच जैवसुरक्षेचे कडक नियम पाळणे, आयात प्रक्रिया सुलभ करणे आणि देशातील मत्स्यव्यवसायाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी विशेष भर देण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीस केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री श्री. प्रा. एस. पी. सिंग बघेल उपस्थित होते. याशिवाय भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव, विभागातील वरिष्ठ अधिकारी, आयसीएआर (ICAR) संस्थांमधील नामवंत शास्त्रज्ञ, एमपीईडीए (MPEDA) आणि सीएए (CAA) चे प्रतिनिधी उपस्थित होते. यात कोळंबी शेती, हॅचरी, निर्यात आणि मत्स्य खाद्य क्षेत्रातील विविध भागधारकांनीही चर्चेत सहभाग घेऊन मत्स्यव्यवसायाच्या शाश्वत विकासासाठी आपली मते मांडली.














