
मालवण : कोकणाने शिवसेनेला भरभरून दिल. मुंबईस्थित कोकणातील चाकरमानी हे नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिले. मात्र, शिवसेनेन कोकणाला काय दिल ? असा सवाल करत भाजपने उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले. सिंधुदुर्ग बदलतोय...सिंधुदुर्ग स्थिरावतोय अशी टॅग लाईन देऊन न भूतो न भविष्यती अशी रेकॉर्ड ब्रेक सभा केली. जसा सिंधुदुर्ग बदलतोय तशी मुंबई सुद्धा बदलणार आणि स्थिरावणार ही नवी टॅग लाईन देऊन भाजपने आई भराडी देवीच्या साक्षीने मुंबई महापालिकेचे रणशिंग आंगणेवाडीच्या रेकॉर्ड ब्रेक सभेत फुंकले.
आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने भाजपाने भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते. श्री भराडी देवीच्या यात्रेला मुंबईस्थित चाकरमान्यांसह राज्यभरातील भाविक येतात. त्यामुळे आंगणेवाडीला जोडणारे सर्व रस्ते चकाचक करण्यात आले. दरवर्षी खड्डेमय रस्त्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर झाला. कधी नव्हे लाखो भाविकांच्या या यात्रेत भाविकांचे फोन खणखणू लागले. भाविकांना ज्या सोयी सुविधा लागतात त्या सर्व सुविधा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुरविल्या. आंगणेवाडीचा कार्यपालट करणाऱ्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने सुद्धा असा काम करणारा पालकमंत्री पहिल्यांदाच लाभल्याचे सांगत रवींद्र चव्हाण यांचे तोंडभरून कौतुक केले. आंगणेवाडी, कुणकेश्वर येथे केलेल्या कामांच्या जोरावर भाजपाने सिंधुदुर्ग बदलतोय...सिंधुदुर्ग स्थिरावतोय अशी टॅग लाईन देऊन आंगणेवाडी येथे भव्य अशी रेकॉर्ड ब्रेक सभा घेतली.
या सभेत केंद्रीयमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, आ. प्रवीण दरेकर, आ. निरंजन डावखरे, आ. प्रसाद लाड, आ. कालिदास कोळंबकर, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, यासह भाजपाचे दिग्गज नेते मंडळी या मेळाव्याला उपस्थित होती. सिंधुदुर्ग बदलतोय....सिंधुदुर्ग स्थिरावतोय हा धागा पकडून सर्व नेत्यांनी मुंबई बदलणार आणि स्थिरावणार अशी घोषणा देऊन प्रचाराचा शुभारंभ केला. पुढच्या वर्षी याचं व्यासपीठावर मुंबईचे 150 नगरसेवक आणि महापौर बसवणार असा निर्धार यावेळी करण्यात आला. मुंबई, कोकणाला बदल घडवायचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही. कोकणाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भरभरून दिले. पण उद्धव ठाकरे यांनी काय दिले ? असा सवाल करत ठाकरेंना टार्गेट करण्यात आले. मुंबई महापालिकेत शिवसेनेन भुरटेगिरी करत दरोडा घातल्याची टिका आशिष शेलार यांनी केली. येथील तरुण रोजगारासाठी शहरात जात असे. इथले तरुण इथेच स्थिरावणे गरजेचे आहे. कोकणातील प्रत्येक तरुणाचा आपल्यावर विश्वास आहे, त्यामुळे रोजगार वाढीसाठी छोटे प्रकल्प येथे आले पाहिजे अशी मागणी फडणवीस यांच्याकडे करत रवींद्र चव्हाण यांनी बेरोजगारीच्या मुद्द्याला हात घातला.
सर्वच नेते उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडत असताना नारायण राणे, देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करण्याची संधी सोडली नाही. उद्धव ठाकरे यांचे कोकणावरील प्रेम हे बेगडी आहे. फक्त थापा मारण्यापलीकडे उद्धव ठाकरे यांनी काहीही केले नाही. खोटं बोलून लोकांची माथी भडकवली. सर्व प्रकल्पांना विरोध केला. असे सांगत राणे, फडणवीसांनी देखील मुंबईसह तळकोकणातल्या जनतेच्या महत्वाच्या मुद्द्यांना हात घालत उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.
मुंबई महापालिका निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. काहीही करून महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचा चंग बांधला आहे. गेली अनेक वर्षे महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपा कामाला लागली आहे. गेले दोन वर्षे भाजपाने मुंबईकरांच्या अनेक प्रश्नांना हात घालत आवाज उठवीला आहे. मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मराठी कट्टा सुरु करून मराठी माणसांचे प्रश्न समजून घेतले. मराठी मतदार हे सर्वात जास्त तळकोकणातले आहेत. म्हणूनच या तळकोकणातून भाजपाने मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले आहे. भाजपा येणार... मुंबई घडवणार याबरोबरच सिंधुदुर्ग बदलतोय तस मुंबई सुद्धा बदलणार आणि स्थिरावणार अशी टॅग लाईन देऊन प्रचाराचा शुभारंभ केला.














