मुंबई : मुंबईत बुधवारी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्क मैदानात तर शिंदे गटाची बीकेसीमधील मैदानात सभा पार पडली. दोन्ही सभांना मोठ्या संख्येने समर्थकांनी गर्दी केली होती. दरम्यान, ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार पोलिसांनी कोणाच्या सभेला जास्त गर्दी होती यासंबंधीची आकडेवारी दिली आहे.
शिवसेनेने २.५ लाख लोकांनी मेळाव्याला उपस्थिती लावल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे तीन लाख लोक शिंदेंच्या मेळाव्याला उपस्थित होते असं सांगितलं आहे. दरम्यान, पोलिसांच्या अंदाजानुसार उद्धव ठाकरेंच्या सभेला एक लाख तर एकनाथ शिंदेंच्या सभेला दोन लाख लोक उपस्थित होते. शिवाजी पार्क मैदानाची क्षमता ८० हजार, तर बीकेसीमधील मैदानाची १ लाख क्षमता आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सभेला सुरुवात होताच ५० टक्क्यांहून अधिक लोकांनी काढता पाय घेतला असा शिवसेनेचा दावा आहे. शिंदेंच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड तास भाषण केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण अंतिम टप्प्यात पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली होती. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी अवघ्या पाऊण तासामध्ये आपंल भाषण संपवलं.