महाबळेश्वर : पत्रकारांबाबत कायदा अजून प्रलंबीत आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले याबाबत कडक कायदा होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. अधिस्विकृती बाबत आपण एकत्र येऊन यावर चर्चा करून निर्णय घेणे गरजेचे आहे. पत्रकारांना कोणीच न्याय देत नाही. मालक पण देत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून काही करता येईल का, यावर विचारविनिमय सुरु आहे. नियमितपणे सरकार आणि आपण तीन महिन्यांनी एकत्र बैठक घेणे आवश्यक आहे. त्या प्रमाणे आपण संयुक्त एक बैठक घेऊ, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
डिजिटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर येथे सुरु आहे. त्या अधिवेशनात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.
ते म्हणाले, एकत्र आल्याशिवाय एक दिशा ठरत नाही. दिशा मिळायची असेल तर बैठका आणि अधिवेशन होणे गरजचे असते. समाजाला दिशा आणि धडा सुद्धा तुम्ही शिकवू शकता. त्यामुळे बातमी दाखवताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. एखादा भडक बोलला ते सुद्धा जसच्या तसे दाखवले जाते, हे चुकीचे आहे. त्यामुळे शब्द जपून वापरणे आवश्यक आहे. एकवेळ राजकीय नेत्यांना प्रसिद्धी नाही दिली तरी चालेल. पण समाजात आज अनेक व्यक्ती आहेत जे काहीतरी नवीन करत आहेत. त्यांना प्रकाशझोतात आणणे गरजेचे असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.