कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरण कंपनीमध्ये ५६० कंत्राटी कर्मचारी सद्यस्थित कार्यरत आहेत, हे कर्मचारी कायम कामगारांच्या रिक्त पदावर कंत्राटी म्हणून वायरमन, क्लार्क शिपाई ड्रायव्हर म्हणून तुटपुंजा मानधनावर कार्यरत आहेत. या मानधनात त्यांच्या कुटूंबीयांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण होत नाहीत यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केलेल्या विविध मागण्या शासनाकडे व प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. त्यातच कंत्राटदार कामगारांचे आर्थिक शोषण करत आहेत. प्रशासन त्यांच्यावर काही कारवाई करत नाही यामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्गच्यावतीने तीनशेच्याहून अधिक कंत्राटी कर्मचारी मुंबई येथे १ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होणार आहेत निवेदन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाअधिकारी किशोर तावडे यांना आंदोलन निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष आनंद लाड दिनेश राऊळ, विराज गावडे, राकेश हुमरमळेकर, अक्षय परब , संभाजी तावडे, मारुती मेस्त्री, राजू घाडी उपस्थित होते.
जिल्ह्यात एक नोव्हेंबर रोजी वीज ग्राहकांच्या लाईटची गैरसोय झाल्यास व याचा नाहक त्रास जिल्हा वासियांना झाल्यास जिल्हा वासियांना समजून घेत सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र बीज कामगार संघाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी केला आहे.