वेंगुर्ल्याचा तेजस मेस्त्री ठरला पुणे विद्यापीठाचा गोल्ड मेडलचा मानकरी

Edited by: ब्युरो
Published on: July 02, 2023 18:43 PM
views 484  views

वेंगुर्तेला : तेजस विजयानंद मेस्त्री याची संगीतातील शिक्षणाची सुरुवात वेंगुर्ले येथील सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका गुरु सौ अनघा गोगटे यांच्याकडे 2007 सालापासून झाली. त्यांच्या मार्गदर्शनातून संगीत विशारद पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 

     संगीत विषयातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ललित कला केंद्र गुरुकुल पुणे येथे 2018 या साली प्रवेश घेतला. तेथे 3 वर्ष डॉ. केशवचैतन्य कूंटे,  हेमा देशपांडे , श्री रोहन चिंचोरे तसेच ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रविण भोळे यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. तसेच पुणे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त गुरू आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे जेष्ठ शिष्य पं. हेमंत पेंडसे यांच्याकडून हिंदुस्तानी  शास्त्रीय गायनाचे शिक्षण मिळाले. आत्ताच जाहीर झालेल्या निकालानुसार तेजस मेस्त्री याने संगीत विषयातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण विशेष योग्यता श्रेणीने पूर्ण केले असून ललित कला केंद्र विभागामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे व यासाठी पुणे विद्यापीठाकडून त्याला सुवर्णपदक जाहीर झाले असून काल झालेल्या पदवी प्रदान समारंभामध्ये त्याला सन्मानित करण्यात आले आहे. 

         तेजस मेस्त्री याचे पुढील गायनातील शिक्षण पं हेमंत पेंडसे, डॉ. केशवचैतन्य कुंटे, सौ अनघा गोगटे, सौ सुचेता अवचट, श्री राजीव आत्मज इत्यादी गुरुंपाशी चालू आहे. या मिळालेल्या यशाबद्दल तेजसचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.