पावसाळ्यापूर्वी वेंगुर्ला नगरपरिषद अॅक्शन मोडवर !

शहरातील गटारे - ओहोळ साफसफाईची कामे जलदगतीने !
Edited by: दिपेश परब
Published on: May 15, 2024 11:45 AM
views 165  views

वेंगुर्ले : पावसाळयापूर्वी वेंगुर्ले शहरातील सर्व ओहोळ व गटारांमध्‍ये गाळ, प्‍लॅस्‍टीक व कचरा साचल्‍याने अल्‍प प्रमाणात पाऊस झाला तरी व्‍हाळी व गटारांचे पाणी रस्‍त्‍यांवर येते त्‍यामुळे स्‍थानिक रहिवाशांना त्‍याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. स्वच्छतेअभावी ओहोळ व गटारांमध्‍ये घाणीचे थर साचून राहतात त्‍यामुळे परिसरामध्‍ये दुर्गंधी पसरुन नागरीकांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न उद्भवतो त्‍याचप्रमाणे डासांच्‍या प्रादुर्भावाने अनेक साथीचे आजार पसरण्‍याचा धोका असतो. 

        या अनुषंगाने वेंगुर्ला शहरातील नागरीकांच्‍या आरोग्‍याचे हित लक्षात घेवून वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत शहरातील गटारे व व्‍हाळी साफसफाईची कामे जलदगतीने पूर्ण करण्‍यात येत आहेत. वेंगुर्ला शहरातील मुख्‍य व अंतर्गत रस्‍त्‍यांच्‍या दुतर्फा असलेली गटारे, शहरातील विठ्ठलवाडी, दाभोसवाडा, राजवाडा, गावडेवाडी,कलानगर, नातू व्‍हाळी, पोकळे गल्‍ली, गाडीअड्डा, होळकर गल्‍ली व आनंदवाडी याठिकाणी असणारी मोठी गटारे/ओहोळ पाऊस सुरु होण्‍यापूर्वी  पूर्णपणे साफ  करुन घेण्‍याच्‍या उद्देशाने नगरपरिषदेमार्फत आवश्‍यक ती  कार्यवाही करण्‍यात  येत आहे. 

त्‍यानूसार बंदर रोड, दाभोसवाडा, गावडेवाडी , गिरपवाडा, जुना स्‍टॅंड, जुनी पोलीस लाईन, भुजनाकवाडी, कलानगर, दाभोली नाका  ते बस स्‍टॅंड, या  भागातील गटारे व ओहोळ साफसफाईचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच उर्वरीत शहरातील गटारे व ओहोळांची साफसफाई पावसाळयापूर्वी पूर्ण करण्‍यात येणार आहेत.  

सर्व शहरातील गटारे / ओहोळ  साफसफाई पूर्ण झाल्यानंतर शहरामध्ये डास फवारणी करण्यात येणार आहे. तसेच पावसाळयाच्‍या कालावधीत उद्भवणाऱ्या आपत्ती निवारणासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कक्ष स्‍थापन करण्‍यात येणार आहे.

त्‍याचप्रमाणे वेंगुर्ला शहरातील ज्‍या इमारती धोकादायक झालेल्‍या आहेत त्‍या मिळकतधारकांना नोटिसा नगरपरिषदेने बजाविलेल्‍या आहेत. त्‍यांनी बजाविणेत आलेल्‍या नोटीसीनुसार कार्यवाही करुन तशी  माहिती नगरपरिषदेस देण्‍यात यावी रस्‍त्‍याने जाणा-या येणा-या नागरीकांचे जिवितास कोणताही धोका पोहोचणार नाही याची दक्षता घ्‍यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे. याकामी संबंधित नागरीकांनी वेळीच दक्षता न घेतल्‍यास कोणतीही वित्‍तीय जिवितहानी झाल्‍यास  त्‍यास नगरपरिषद जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्‍यावी.  तसेच शहरातील रहदारीच्‍या ठिकाणी व रस्‍त्‍यांलगत सार्वजनिक मालकीच्‍या जागेमध्‍ये किंवा वैयक्तिक मालकीच्‍या जागेमध्‍ये जी धोकादायक झाडे असतील, ती झाडे महाराष्‍ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन  (सुधारणा) अधिनियम २०२१ अन्‍वये या कार्यालयाची रितसर परवानगी घेऊन संबंधितांनी तोडून घ्‍यावीत अन्‍यथा अशा धोकादायक झाडांमुळे किंवा झाडांच्‍या फांद्यांमुळे कोणत्‍याही प्रकारची जिवित व वित्‍तहानी झाल्‍यास संबंधित जागा मालक / झाड मालक जबाबदार राहतील.

यामुळे होणा-या दुर्घटनेस वेंगुर्ला नगरपरिषद जबाबदार राहणार नाही याची गंभीरपणे नोंद घ्‍यावी अशा सूचना नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिल्या आहेत.