वेंगुर्ला नगरपरिषद पुन्हा एकदा राज्यात अव्वल

१५ कोटींचे बक्षीस देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान
Edited by: दिपेश परब
Published on: April 20, 2023 15:49 PM
views 1344  views

वेंगुर्ला: 

महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण २०२३ या स्पर्धेत वेंगुर्ला नगरपरिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत राज्यात आपला डंका कायम ठेवला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याकडे १५ कोटींचा धनादेश व प्राणपत्र देत वेंगुर्ला नगरपरिषदेचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे उपस्थित होते. 

   मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी काही महिन्यांपूर्वीच नगरपरिषदेचा कारभार स्वीकारल्यानंतर नगरपरिषदेवर नगराध्यक्ष व नगरसेवक कार्यकारणी नसताना सुद्धा यशस्वीपणे शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत भाग घेत आपल्या उत्कृष्ट कामाचे प्रदर्शन त्यांनी दाखवून दिले. शहरातील स्वछतेचा दर्जा कायम ठेवत संपूर्ण शहरातील भिंतींवर सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व वेंगुर्ला शहराची संस्कृती सांगणारी भित्तीचित्रे काढुन शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि याचेच फलित म्हणून या शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत वेंगुर्ला नगरपरिषद अव्वल ठरली व वेंगुर्ला शहराचा डंका कायम ठेवण्यात यशस्वी झाली आहे. या यशाबद्दल वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.