मुंबई : आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची मंगळवारी मुंबईत भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर झालेल्या कामांना वर्कऑर्डर देऊन कामे सुरू करण्याची मागणी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक व पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून अनेक विकास कामे मंजूर होऊन प्रशासकीय मान्यता झाली आहे. निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे.मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांना अद्याप पर्यंत वर्कऑर्डर दिल्या जात नाहीत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची कामे रखडली आहेत. सदर कामे ग्रामस्थांच्या मागणीवरून मंजूर केलेली असून लोकहिताची आहेत. सदरचे रस्ते अत्यंत खड्डेमय झाले असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामांना वर्कऑर्डर देण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.