
देवगड : पश्चिम घाट हा जैवविविधतेचा 'हॉटस्पॉट' म्हणून जगात प्रसिद्ध आहे. पश्चिम घाटात चतुर (dragonflies) आणि टाचण्या (damselflies) यांच्या सुमारे २०० प्रजाती आढळतात. त्यात दरवर्षी नवनवीन प्रजातींची भर पडते. नुकताच शास्त्रज्ञांनी येथून दोन नवीन चतुरांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. या दोन्ही प्रजाती चतुरांच्या गॉम्फिड (Gomphid) कुळातील असून ते त्यांच्या काळ्या-पिवळ्या शरीरामुळे आणि शेपटीकडील उपंगांच्या शस्त्रासारख्या आकारामुळे ओळखले जातात.
नव्याने शोधण्यात आलेल्या चतुरांपैकी एक चतुर हा केरळ राज्यातील थिरूवनंतपुरम जिल्ह्यातील असून दुसरा चतुर हा महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शोधण्यात आला आहे. केरळ मधल्या चतुराचे नामकरण मेरोगोम्फस आर्यानाडेन्सिस (Merogomphus aryanadensis) असे करण्यात आले असून, महाराष्ट्रातील चतुराला मेरोगोम्फस फ्लॅवोरिडक्टस (Merogomphus flavoreductus) असे नाव देण्यात आले आहे. केरळमधून विवेक चंद्रन, रेजी चंद्रन, डॉ. सुबीन जोस; महाराष्ट्रामधून डॉ. दत्तप्रसाद सावंत, डॉ. पंकज कोपर्डे आणि बंगळुरू मधून डॉ. कृष्णमेघ कुंटे या चमूने ही लक्षवेधी कामगिरी केली आहे.
आर्यानाडचा कंकासुर:
मेरोगोम्फस आर्यानाडेन्सिस चा शोध केरळमधील थिरूवनंतपुरम जिल्ह्यातील आर्यानाड या गावी लागला. २०२० साली या भागातील कारामाना नदीजवळच्या एका छोट्या ओढ्याजवळ रेजी चंद्रन यांना हा चतुर दिसला होता. मात्र ही जागा पेप्पारा अभयारण्याच्या जवळ असल्याने येथे हत्तींचे आगमन झाले आणि पुढची दोन वर्षे रेजी यांना हा चतुर पाहणे शक्य झाले नाही. मात्र फोटोंचे नीट निरीक्षण केल्यावर ही प्रजात इतर मेरोगोम्फस पेक्षा खूपच वेगळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांनी हे थ्रिसूर येथील चतुर अभ्यासक विवेक चंद्रन यांच्या निदर्शनास आणून दिले आणि शेवटी ऑगस्ट २०२४ मध्ये या चतुराचे दोन नमुने पकडण्यात त्यांना यश आले. ही प्रजात इतर मेरोगोम्फस पेक्षा खूपच लहान होती आणि नराच्या शेपटीकडील उपांगांचा आकार हा एखाद्या समांतर जबडे असलेल्या पक्कडीसारखा होता. त्यामुळे ही नवीन प्रजात असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. त्यानंतर विवेक यांनी डॉ. दत्तप्रसाद सावंत यांच्याशी सल्लामसलत करून नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स, बंगळुरू येथील डॉ. कृष्णमेघ कुंटे यांच्या प्रयोगशाळेत पुढील तपास करण्याचे ठरवले. डॉ. कुंटेंच्या साहाय्याने प्रयोगशाळेत नमुन्यांची आकारशास्त्राद्वारे तपासणी केल्यावर आणि सूक्ष्मदर्शकाखाली छायाचित्रे घेतल्यावर हा प्रजात संपूर्ण जगात नवीन असल्याचे सिद्ध झाले.
कोकण कंकासुर:
विवेक चंद्रन यांच्या नव्या प्रजातीमुळे डॉ. सावंत यांनीही त्यांच्याकडे असलेल्या सर्व मेरोगोम्फस प्रजातींचे फोटो पुन्हा अभ्यासले. यात त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातून छायाचित्रित केलेले मेरोगोम्फस काहीसे वेगळे वाटले. या सर्व मेरोगोम्फस चतुरांच्या शरीरावर पिवळे पट्टे कमी असून बराचसा भाग काळा होता. मात्र मलबार कंकासुर (मेरोगोम्फस तमाराशेरीयन्सिस) या १९५३ साली शोधण्यात आलेल्या प्रजातीशी साधर्म्य असल्याने त्यांनी या सर्व मेरोगोम्फसना मलबार कंकासुर समजून त्यांची नोंद केली होती. मात्र ऑगस्ट २०२४ मध्ये देवगड तालुक्यातील हडपिड गावातून पकडलेल्या नमुन्यांचे निरीक्षण केल्यावर त्यांना ही प्रजात देखील नवीन असल्याचे लक्षात आले. डॉ. कुंटे यांच्या प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास केल्यावर या नवीन प्रजातीवर शिक्कामोर्तब झाले. या प्रजातीचा रंग बहुतांश काळा असून त्यावर इतर मेरोगोम्फस पेक्षा याच्या शरीरावर पिवळ्या पट्ट्यांचे प्रमाण फार कमी आहे. शिवाय नराच्या शेपटीकडील उपांगांचा आकार हा एखाद्या बूमरँग सारखे जबडे असलेल्या पक्कडीसारखा आहे.
जनुकीय अभ्यास:
शरीरावरील रंगसंगती आणि जननेंद्रियांच्या आकार वेगळा असूनही सारे मेरोगोम्फस हे जवळपास सारखे दिसत असल्याने या सर्व अभ्यासात जनुकीय परीक्षण करून या प्रजातींचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे येथील डॉ. पंकज कोपर्डे यांनी हे जनुकीय परीक्षण करून मेरोगोम्फस आर्यानाडेन्सिस हा ११% तर मेरोगोम्फस फ्लॅवोरिडक्टस हा ५% वेगळा असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आणि पश्चिम घाटातून दोन सुंदर चतुरांच्या प्रजाती उदयाला आल्या.
यानंतरचे महत्त्वाचे काम हे संशोधन लवकर प्रसिद्ध करण्याचे होते. विवेक चंद्रन आणि डॉ. दत्तप्रसाद सावंत यांनी विशेष पुढाकार घेऊन या संशोधनाचे लिखाण विक्रमी कमी वेळेत पूर्ण केले आणि १४ फेब्रुवारी २०२५ रोजी झूटॅक्सा या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये हे २६ पानी संशोधन प्रसिद्ध झाले. चंद्रन यांचे लिखाण, उत्तम प्रतीची सूक्ष्मदर्शकाखालील छायाचित्रे, जनुकीय परीक्षण याचबरोबर डॉ. सावंत यांनी रेखाटलेली उच्च दर्जाची रंगीत रेखाटने हे या संशोधन पत्रिकेचे वैशिष्ट्य आहे.
नवीन चतुरांचे नामकरण:
मेरोगोम्फस आर्यानाडेन्सिस चे नाव हे आर्यानाड या गावावरून आलेले आहे. थिरूवनंतपुरम जिल्ह्यातील हे छोटेसे गाव रेजी चंद्रन यांनी प्रकाशात आणले. या गावातून अनेक दुर्मिळ चतुर आणि टाचण्यांची नोंद झाली असून हे 'चतुरांचे गाव' म्हणून प्रसिद्ध होत आहे. दुसऱ्या चतुराचे मेरोगोम्फस फ्लॅवोरिडक्टस हे नाव त्याच्या शरीरावर कमी प्रमाणात असलेल्या पिवळ्या रंगामुळे देण्यात आले आहे. इंग्रजीमध्ये यांना अनुक्रमे 'डाईंटी लॉन्गलेग' आणि 'डार्क लॉन्गलेग' असे संबोधले गेले आहे.
चतुर आणि टाचण्या यांचे मराठीत बारसे झालेले नाही. त्यामुळे मेरोगोम्फस या कुळाला मराठीत आजपर्यंत नाव नव्हते. मात्र मेरोगोम्फस प्रजातींच्या नर चतुराला असलेल्या पक्कडीसारखा उपांगांमुळे त्यांना 'कंकासुर' हे नाव दिले गेले आहे. 'कङ्कमुखम्' या संस्कृत शब्दावरून हे नाव तयार केले आहे. याचा अर्थ पक्कडीसारखा जबडा असलेले हत्यार असा होतो.
पश्चिम घाटातील मेरोगोम्फस चतुर:
पश्चिम घाटात याआधी मेरोगोम्फस चतुरांच्या केवळ २ प्रजाती ज्ञात होत्या. यात आता आणखी दोन प्रजातींची भर पडली असून या चारही प्रजाती पश्चिम घाट प्रदेशनिष्ठ प्रजाती आहेत. या पर्वतरांगा आणि आजूबाजूचा परिसर याव्यतिरिक्त हे मेरोगोम्फस इतर कोठेही आढळत नाहीत. मेरोगोम्फस लॉन्गिस्टिग्मा हा आकाराने सर्वात मोठा मेरोगोम्फस सह्याद्रीच्या उंच प्रदेशात आढळतो. साताऱ्यापासून वायनाड पर्यंत याच्या नोंदी आहेत. मेरोगोम्फस तमाराशेरीयन्सिस ही प्रजात आता केवळ केरळ आणि आसपासच्या प्रदेशात आढळते. मेरोगोम्फस आर्यानाडेन्सिस ही प्रजात केवळ पालघाट गॅपच्या दक्षिणेस आढळून आली आहे. मेरोगोम्फस फ्लॅवोरिडक्टसचा आढळ हा केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून आला असून ही प्रजात रत्नागिरी जिल्ह्यापासून उत्तर कन्नड जिल्ह्यापर्यंत आढळू शकते असा कयास आहे. विशेष म्हणजे मेरोगोम्फस चतुरांना जगण्यासाठी शुद्ध पाण्याचे झरे आणि जंगलांनी समृद्ध असलेला भाग लागतो. इतर ठिकाणी हे चतुर तग धरू शकत नाहीत. त्यामुळे जंगले टिकली तरच हे जैववैविध्य टिकेल.
या निमित्ताने पश्चिम घाट आपल्या पोटात अनेक रहस्ये दडवून आहे हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. पश्चिम घाटाचे संवर्धन करून या प्रजातींचे रक्षण करणे हे खूपच महत्त्वाचे आहे.
संशोधनामागची टीम:
विवेक चंद्रन हे ख्रिस्त कॉलेज, कालिकत विद्यापीठ केरळ येथील पीएचडी स्कॉलर आहेत. याआधी त्यांनी ४ नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. रेजी चंद्रन हे व्यवसायाने फोटोग्राफर असून निसर्गाभ्यासक आहेत. त्यांनीही चतुरांच्या ३ नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. डॉ. सुबीन जोस हे हे ख्रिस्त कॉलेज, कालिकत विद्यापीठ केरळ येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. दत्तप्रसाद सावंत हे व्यवसायाने डॉक्टर असून सहाय्यक प्राध्यापक व फिजिशियन आहेत. त्यांनी याआधी ६ नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. डॉ. पंकज कोपर्डे हे एमआयटी पुणे येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीही याआधी २ नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. डॉ. कृष्णमेघ कुंटे हे जगप्रसिद्ध कीटकशास्त्रज्ञ असून नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स, बंगळुरू येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक प्रजातींचा शोध लावला असून फुलपाखरांवर अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.