मुंबई : शिवसेनेतील फुटीर आमदारांचा सातत्याने ‘गद्दार’ असा उल्लेख करणाऱ्या उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना ‘कुणी केली गद्दारी ? ’ असा प्रतिप्रश्न करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून मुंबई आणि महानगर क्षेत्रात आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांचे एकप्रकारे रणशिंग फुंकल्याचे पहायला मिळाले.
मेळाव्यात भाषणासाठी उभे रहाण्याच्या काही तासांपुर्वी ‘मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नही होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे’ या हरिवंशराय बच्चन यांच्या ओळींचे ट्वीट करत शिंदे यांनी घराणेशाहीच्या मुद्दयावर ठाकरे पिता-पुत्रांची कोंडी करण्यासाठी वातावरण निर्मीती केली होती. हाच मुद्दा पुढे नेत उद्धव यांनी शिवसेना वाढविण्यासाठी काय केले असा सवाल करत शिंदे यांनी नोकर आणि मालकाचा संदर्भ देत शिवसैनिकांची सहानभूतीही मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी सोबत केलेली आघाडी, भाजपशी मोडलेली युती आणि हिंदूत्वाच्या मुद्दयावर ठाकरे पिता-पुत्रांवर टीका करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केल्याने, मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे यांचा प्रचार भाजपच्या वाटेनेच पुढे चालेल हे देखील स्पष्ट होऊ लागले आहे.