
मुंबई : बोधगया प्रॅाडक्शन, महाराष्ट्र एकता अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डिंपल पब्लिकेशन यांच्या सहकार्याने आयोजित, ग्रंथसंगती मालिकेचा चौथा भाग मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात पार पडला.
प्रसिद्ध लेखक आणि कवी डॅा. महेश केळुसकर यांच्या ‘जय भवानी जय मराठी’ या राजकीय कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र पै यांच्या हस्ते झाले. राजकीय लेखनात उपरोध व उपहास ही शब्द शस्त्रे वापरून भ्रष्ट राजकारण्यांचे वस्त्रहरण करण्याचा आचार्य अत्रे यांचा वारसा डॉ. महेश केळुसकर पुढे चालवत आहेत, असे गौरवोद्गार ॲड. पै यांनी यावेळी काढले.
प्रकाशन सोहळ्यात ‘मराठी पाऊल पडते पुढे की मागे?’ या परखड चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी व्यासपीठाचे अध्यक्षपद भूषविले तर, ज्येष्ठ पत्रकार श्री प्रकाश अकोलकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेंद्र पै, झी २४ तास चे संपादक श्री कमलेश सुतार, मराठी भाषा सदिच्छादूत व अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी चर्चासत्रात आपले विचार मांडले. १९९० नंतर मराठी मध्यमवर्गीय लोकांची संपत्ती वाढली आणि हळूहळू हा समाज अस्मिताशून्य होत गेला, असे अध्यक्षीय प्रतिपादन कुमार केतकर यांनी यावेळी केले.चर्चेच्या समारोपात प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांनी प्रेक्षकांच्या वतीने प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त केली आणि प्राथमिक शिक्षण मराठीतूनच देण्याची गरज असल्याचं सांगितलं.
महाराष्ट्र एकता अभियानचे संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद तुळसकर, डिंपल पब्लिकेशनचे प्रकाशक श्री अशोक मुळे व बोधगया प्रॅाडक्शनचे संस्थापक श्री कुणाल रेगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले व आभार मानले.