देशात लोकशाही चिरकाल टिकण्यासाठी प्रयत्न करणे हीच नाथ पै यांना श्रद्धांजली

शरद पवार यांचं वेंगुर्ला इथं प्रतिपादन
Edited by: दीपेश परब
Published on: October 01, 2022 17:22 PM
views 196  views

वेंगुर्ला - मोठ्या देशसेवकाचा सन्मान करण्यासाठी आज आपण सर्वजण उपस्थित राहिलो आहोत. बॅ.नाथ पै यांचे कोकणावर जास्त प्रेम होते. पाकिस्तानपेक्षा चीनपासून आपल्याला धोका आहे हे त्यांनी संसदेमध्ये मांडले होते. कामगार प्रश्नासारखे अनेक प्रश्नांवर त्यांनी संसदेत आवाज उठविला होता. नाथ पै यांची संसदीय लोकशाहीवर निष्ठा होती. आजही देशामध्ये संसदीय लोकशाही चिरकाल टीकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच भारत हा देश जगात विकसित होण्यासाठी सर्वांनीच सहभाग घेणे हीच बॅ.नाथ पै यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांनी वेंगुर्ला येथे केले.


      बॅ.नाथ पै जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता आज वेंगुर्ला येथे झाली. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्री.पवार बोलत होते. यावेळी श्री. पवार यांनी आपल्या भाषणात बॅ.नाथ पै यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. बॅ.नाथ पै यांचे बालपण वेंगुर्ला येथे झाले. पूर्वीच्या रांगणेकर हायस्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. म्हणूनच ज्यावेळी अदिती पै यांनी या कार्यक्रमासाठी आपणाला निमंत्रित केले, त्याचवेळी हा कार्यक्रम वेंगुर्ला येथेच घ्या, असे सांगितले. त्याप्रमाणे हा कार्यक्रम आज वेंगुर्ला येथे होत आहे. शिक्षणानंतर ते बेळगांव येथे गेले. नाथ पै हे आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या कुटुंबातील होते. त्यांच्या वडिलांच्या पश्चात ६ ते ७ जणांचे कुटुंब त्यांच्या आईने सांभाळले. काजू आणून ते सोलून विकताना हे काम त्यांच्या आईने नाथ पै यांच्याकडूनही करवून घेतले. बेळगांव येथे देश स्वातंत्र्याच्या चळवळीत ते सहभागी झाले. ब्रिटीशांच्या विरोधात निदर्शन केली. प्रसंगी त्यांना अटकही झाली. पंडित नेहरु, लालबहादुर शास्त्री, इंदिरा गांधी यांना नाथ पैंबद्दल आदर होता. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र प्रश्न प्रभावीपणे मांडला होता. त्यांची जुनी भाषणे वाचनीय आहेत. आज नाथ पै जरी आपल्यात नसले तरी त्यांचा इतिहास, त्यांचे विचार आाणि कर्तृत्व मार्गदर्शक ठरत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे वेंगुर्ला शहरात आगमन होताच राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे बॅ.खर्डेकर महाविद्यालय येथे जल्लोषात स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, राष्ट्रवादीचे अॅन्थोनी डिसोजा, प्रज्ञा परब, नितीन कुबल, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉ.संजिव लिगवत, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, तालुका उपाध्यक्ष योगेश कुबल, कृषीभूषण संतोष गाडगीळ, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, भरत आळवे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब यांच्यासह अन्य उपस्थित होते.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे सहकारी वेंगुर्ला येथील ज्येष्ठ नेते असलेले शिवाजी कुबल यांच्या निवासस्थानी जाऊन श्री.पवार यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची पहाणी केली.