
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओ प्रसारण 'मन की बात'चा 100 वा भाग संस्मरणीय करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विविध तयारी केली आहे. भाजपने देशभरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी 100 ठिकाणी अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, जिथे लोकांना ते ऐकता येईल. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी पक्ष विदेशासह सुमारे चार लाख ठिकाणी व्यवस्था करणार आहे. पक्षाच्या परदेशी शाखा आणि अनेक गैर-राजकीय संघटनांना देखील रेडिओ प्रसारण जास्तीत जास्त वाढवण्यास सांगितले आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांच्या सर्व राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी कार्यक्रम ऐकण्यासाठी प्रतिष्ठित नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या 100 व्या पर्वासाठी मुंबई भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरातील 36 विधानसभेतील 5 हजारांहून अधिक ठिकाणी 'मन की बात' कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, कार्यक्रमाचे प्रसारण सकाळी अकरा वाजता होणार असल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सर्व 36 विधानसभेत प्रत्येकी 100 कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत.
दुसरीकडे, 'मन की बात' कार्यक्रमाच्या 100 व्या पर्वासाठी ठाणे शहरातही भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात ठाणे कारागृहासह सुमारे 400 हून अधिक ठिकाणी 'मन की बात' कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती भाजप आमदार ठाणे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिली आहे. ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघात सुमारे 400 हून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे कारागृहातील कैद्यांसमोरही कार्यक्रम सादर केला जाणार असून, ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात 101, ओवळा-माजिवडा मतदारसंघात 90, कोपरी पाचपाखाडीत 86, तर मुंब्रा-कळवा मतदारसंघासह शीळ-दिवा परिसरात 103 ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यास सुरूवात केली होती. 'मन की बात' कार्यक्रमाचे 99 भाग प्रसारित झाले आहेत.