ब्युरो न्युज : प्रॉपटी शोधणाऱ्यांसाठी एकाच छताखाली विविध पर्याय उपलब्ध करुन देणे आणि सर्व बांधकाम व्यावसायिक, विकासक, आर्किटेक्टआदी सर्वांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी क्रेडाई सिंधुदुर्गच्यावतीने १४, १५ व १६ एप्रिल २०२३ या तीन दिवसांच्या कालावधीत मुंबई येथे सिंधुदुर्ग प्रॉपटीज २०२३ च्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती क्रेडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश जैतापकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकातील माहितीनुसार, क्रेडाई सिंधुदुर्गचे पदाधिकारी गजानन कांदळगावकर, शेखर मोर्वेकर, अनिल साखळकर यावेळी उपस्थित होते. सिंधुदुर्ग हा पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच प्रवास करण्यासाठी सोपा, आरामदायी, राहणीमान, चांगल्या पायाभूत सुविधा, आधुनिक सुखसोयी व उत्कृष्ट कनेक्टीविटी असल्यामुळे येत्या काळात सिंधुदुर्ग हा जिल्हा स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक आदर्श ठिकाण म्हणून नावारुपास येत आहे. मुंबईमध्ये कोकणातले लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्याना स्थावर मालमत्तेविषयी माहिती व्हावी आणि बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्यापर्यंत पोहचता यावे यासाठी १४, १५ व १६ एप्रिल २०२३ या कालावधीत मुंबईत पु. ल. देशपांडे अकादमी, रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे सिधुदुर्ग प्रॉपटीज २०२३ चे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये एकूण २६ स्टॉल मांडले जाणार आहेत. इच्छुकांनी क्रेडाई सिंधुदुर्गकडे संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेने पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.