मुंबई : संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. मात्र, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत रहावे लागणार आहे. जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता ९ नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.
राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केले. जामिनावरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे. दरम्यान, संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती. विशेष म्हणजे प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी 9 नोव्हेंबरला कोर्ट निर्णय देणार आहे. आजच्या सुनावणीवेळी त्यांचे कुटूंबदेखील कोर्टात हजर होते.
ईडीने केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलने बेकायदेशीर कारवाईमधून 1,039.79 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून 100 कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत.
ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं इडीने सांगितले. 2010 साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 83 लाख रुपये जमा केले होते.
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत.