सावंतवाडी : कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य अधिवेशनाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निमंत्रित करण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे, कोल्हापूर, सिंधुदुर्गचे शिक्षक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून मंत्री केसरकर यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी मंत्री केसरकर यांनी कोल्हापूर येथील संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले. त्याचबरोबर शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवर अनौपचारिक चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान मुख्य विषय होता तो ० ते २० पटसंखेच्या आतील शाळा बंद करण्याचा शासनाचा विचार आहे, तेव्हा ० ते २० पटसंख्या असलेल्या राज्यातील विविध जिल्हा परिषद शाळा बंद करू नये, असे कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने निवेदन करण्यात आले. या निवेदनाला उत्तर देताना मंत्री केसरकर यांनी अशा कुठल्याही प्रकारचा निर्णय शासनाने अजून घेतलेला नाही. आणि कास्ट्राईब शिक्षक संघटनेने दिलेल्या मुद्द्यांचा विचार शासन स्तरावर नक्की केला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, याची पूर्णतः हमी त्यांनी दिली.
त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ केली जाईल, दारिद्रय रेषेखालील मुलींचा उपस्थिती भत्ता ५ रू. केला जाईल आणि त्यासाठी लवकरच सामाजिक न्याय विभागाशी बैठक आपण मंत्रालयामध्ये घेऊ, असेही आश्वासन त्यांनी दिले. मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांवरती कास्ट्राईब शिक्षक संघटनेसोबत लवकरच मंत्रालयामध्ये बैठक घेतली जाईल. राज्यातील केंद्रप्रमुखांच्या भरतीबाबत प्रश्न विचारला असता मंत्री महोदयांनी केंद्रप्रमुखांची भरती येत्या चार महिन्यांमध्ये पूर्ण केली जाईल, तसेच शिक्षण सेवकांची भरती प्रक्रिया सुद्धा लवकरच पूर्ण केली जाईल. मागासर्गीयांचा भरतीमधील अनुशेष भरला जाईल, असेही ठोस आश्वासन त्यांनी दिले.
राज्यातील शिक्षण सेवकांचे मानधन हे जवळपास दुपटीने वाढविले असल्यामुळे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे विशेष अभिनंदन कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा आणि आणि त्यातून पुढे नामवंत वैद्यकीय महविद्यालयामध्ये, इंजिनियरिंग इन्स्टिट्यूट प्रवेश मिळावा, यासाठी अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र शासनाने किमान दहावी बारावीच्या विज्ञान शाखेसाठी 'एनसीईआरटी'चा अभ्यासक्रम लागू करावा, दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेत राज्यात अव्वल स्थानी सिंधुदुर्ग जिल्हा असतो. मात्र पुढे स्पर्धात्मक शिक्षणाच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले संधी अभावी मागे पडतात. जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षेसाठी शैक्षणिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावे, तरच सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या विकासाचे रोल मॉडेल बनेल, अशी भूमिका आकाश तांबे यांनी मांडली.
त्यावर मंत्री केसरकर यांनी या बाबींवरती आपण विचार केलेला असून पुढील काळामध्ये याचे रिझल्ट बघायला मिळतील, असे सांगितले.
यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांच्यासोबत कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटनेचे सरचिटणीस संजय कुर्डूकर, कोषाध्यक्ष पी. डी. सरदेसाई, विजय कांबळे, सिंधुदुर्गचे जिल्हा सचिव किशोर कदम, डॉ. पारस जाधव (देवगड कॉलेज), सुधीर तांबे (मुख्याध्यापक, नांदगाव हायस्कूल), चळवळीतील ज्येष्ठ नेते रमाकांत जाधव आदी शिक्षक मंडळी उपस्थित होते.