सावंतवाडी : भाडोत्री प्रवक्ते आणुन शिंदे गटावर सुरू असलेल्या जहरी टीकेमुळे आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. यापुढे आरोप कराल तर आम्हालाही तोंड उघडावं लागेल, असा स्पष्ट इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेनेच्या फुटीला आदीत्य ठाकरे हेच जबाबदार असल्याचे सांगत ते म्हणाले, विधान परिषद निवडणुकीवेळी आम्ही राष्टवादीच्या उमेदवाराला मदत केली. मात्र त्यांनी आमच्या उमेदवाराला मदत केली नाही. शिवसेनेच्या जीवावर आपला पक्ष वाढवायचा आणि शिवसेनेला संपवायचं, हेच धोरण राष्टवादी कॉंग्रेसचं आहे. हे आम्ही तेव्हाच ओळखलं होतं. मात्र तरीही आम्ही ठाकरेंसोबत राहीलो. 40 आमदार फुटल्यानंतर खोके घेतल्याचा आरोप प्रत्येकवेळी आमच्यावर केला जातो. पैशानं सरकार बनवता येत असतं तर पैशेवाल्यांनी सरकार चालवले असते. परंतु असे असतानाही गुवाहाटीहून परत येताना आमची शिवसेनेकडं परत यायची तयारी होती. भाजपशी आमची कुठलीही कमिटमेंट झाली नव्हती. तेव्हा का नाही प्रतिसाद दिलात?
ते म्हणाले, भाडोत्री प्रवक्ते आणुन आमच्यावर टीका केली जात आहे. खोक्यांवरून वारंवार डिवचले जात आहे. मात्र आता सहनशक्तीचा अंत झाला आहे. आता पुन्हा जर बोलाल तर आम्हालाही तोंड उघडावं लागेल, असा निर्वाणीचा इशाराच मंत्री केसरकर यांनी थेट ठाकरेंना दिला.