मुंबईः राज्यपालनियुक्त १२ आमदारांची मविआ सरकारने दिलेली यादी परत मागवून नवी यादी देणार असल्याचे शिंदे-फडणवीस सरकारने स्पष्ट केले असतानाच आता नव्या यादीत शिंदे गटाला १२पैकी अवघ्या तीन जागा मिळणार असून नऊ जागा भाजपला मिळणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
शिंदे गटाकडे ४० आमदार असल्याने त्यांची एकूण शक्ती भाजपपेक्षा एक तृतीयांश आहे. मात्र तरीही त्यांना मंत्रीमंडळात १८ पदे मिळाणार असल्याचे समजते. यातील दोन ते तीन पदे ही अपक्षांना देण्यात येणार असल्याने त्यांच्या गटाला १५ मंत्रिपदे मिळतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हेच प्रमाण महामंडळे व राज्यपालनियुक्त आमदारांमध्येही लावले गेले असल्याचे म्हणणे आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत. त्यातच पहिल्या यादीत ज्या इच्छुकांची वर्णी लागलेली नाही, त्या सगळ्यांना पुढील विस्तारात आपला समावेश करून घेण्याची घाई झालेली आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पक्षबांधणीसाठी प्रत्यक्षात नागरिकांमध्ये जाऊन त्यांना राजकीय धोका दिला गेला, असा थेट आरोप शिंदे व भाजपवर करत आहेत. अशा वेळी जनाधार वाढवण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी राज्यपालनियुक्त विधान परिषद सदस्यांच्या यादीत अधिक जागा मिळाव्यात, असा शिंदे यांचा प्रयत्न आहे. मात्र १०५ आमदार असूनही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा केलेला त्याग हा शिंदे गटाला मिळणाऱ्या सत्तेतील वाट्यात सगळ्यात मोठा अडसर ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्रिपदे आणि राज्यपालनियुक्त आमदार यांची संख्या वाढवून मिळावी, यासाठी एकनाथ शिंदे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशीही चर्चा करण्याची शक्यता त्यांच्या गटातील एका आमदाराने व्यक्त केली.