सावंतवाडी : कोकणचा कांतारा अर्थात कुणकेरीचा प्रसिद्ध हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. शंभर फूट उंच हुड्यावर चढलेल्या अवसारांच्या दिशेने दगडांचा मारा करत भाविकांनी या चित्तथरारक उत्सवाचा याची देही याची डोळा अनुभूती घेतली. कुणकेरीची भावई देवी, आंबेगाव देव क्षेत्रपाल व कोलगाव देव कलेश्वर या तिनं गावची ग्रामदेवत या निमित्ताने एकत्र येतात. बहिण- भावाच नातं यामागे असून गावच्या सीमेवर भावा बहिणींची भेट होते. कोरोनानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
कोकणातील शिमगोत्सव ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या सातव्या दिवशी साजरा होणारा हुडोत्सव तालुका जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक मधून भाविक येतात.
कुणकेरीतील शिमग्याच्या सातव्या दिवशीचा हुडोत्सव जिल्ह्यात प्रसिद्ध धार्मिकतेत मानाचा असतो. प्रथेप्रमाणे या हुडोत्सवास सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कर्नाटक या राज्यातील भाविकांनी गर्दी केली होती. कोलगाव, कुणकेरी, आंबेगाव गावाची निशाण हुड्याच्या ठिकाणी सायंकाळी दाखल झाली. या वेळी तिन्ही अवसार प्रसाद उभे करून कौल घेतल्यानंतर श्रींची पालखी घटावर ठेवून तिन्ही अवसार गगनचुंबी शंभर फुटी हुड्यावर एकामागोमाग एक चढू लागले.
यावेळी जमलेल्या भाविकांकडून संचारी अवसारावर दगड मारण्यात आले. विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थिती होते. सायंकाळी भावई देवस्थानचे अवसार हुड्यावर चढतानाचा चित्तथरारक प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. घोडेमोडणी, वाघाचा खेळ, पारंपरिक पाथर (धनगरणीचा दगड) उचलण्याचे पारंपरिक खेळही यावेळी पार पडले. या हुडोत्सवाचे आणखी एक आकर्षण ठरले ते म्हणजे रोंबाटासह हुड्याजवळ आल्यानंतर घोडेमोडणी, वाघाची शिकार हे. याला भाविकांनी मोठी पसंती दिली. महिला वर्गही या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता.
दिवसभरात शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांचे वडील श्री. नार्वेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, कोकण विभाग राष्ट्रवादी महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, भाजप नेते जिल्हा बँक संचालक महेश सारंग, देवस्थान अध्यक्ष महादेव गावडे, कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, उपसरपंच सुनिल परब, कोलगाव उपसरपंच दिनेश सारंग, माजी सभापती प्रमोद सावंत, मंगेश सावंत, सोनिया सावंत, तानाजी सावंत, अभिजित सावंत आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.