कणकवली : कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील ‘दत्तकृपा’ अपार्टमेंटमधील ५६ फ्लॅट धारकांना रत्नागिरी एसीबीने चौकशीच्या नोटिसा बजावल्या आहेत. सन २०१६ ते २०१८ या दरम्यान आमदार वैभव नाईक यांच्याकडून ही फ्लॅट खरेदी झाली आहे. फ्लॅटधारकांनी हे फ्लॅट कसे खरेदी केले, याची चौकशी एसीबी करणार आहे.
शहरातील बांधकरवाडी परिसरात आमदार नाईक यांनी अनेक निवासी संकुले, व्यापारी गाळे बांधले आहेत. यातील केवळ ‘दत्तकृपा’ या एकाच संकुलातील फ्लॅटधारकांच्या फ्लॅट खरेदी व्यवहाराची चौकशी होणार असली तरी उर्वरित सर्व फ्लॅट आणि गाळे धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान एसीबीच्या चौकशीला आम्ही सहकार्य करणार आहोत. तसेच ही चौकशी कणकवलीत व्हावी, अशीही विनंती आम्ही एसीबी अधिकाऱ्यांना केली असल्याची माहिती फ्लॅट धारकांनी दिली.
ठाकरे गटात राहिलेल्या आमदार वैभव नाईक यांनी गेल्या तीन महिन्यापासून रत्नागिरी एसीबी विभागाकडून चौकशी सुरू आहे. यात गेल्या महिन्यात आमदार नाईक यांचा बंगला, दुकान, पाईप फॅक्टरी आणि इतर मालमत्तांची मोजमापे घेण्यात आली. त्यानंतर आमदार श्री.नाईक यांच्या आमदार फंडातून ज्या ग्रामपंचायतींमध्ये कामे झाली, त्या कामांचीही एसीबीकडून चौकशी सुरू आहे. याखेरीज कुडाळ तालुक्यातील काही विकास संस्था यांनाही एसीबीच्या नोटिसा आल्या आहेत.
कणकवली शहरात बांधकरवाडी, परबवाडी, मधलीवाडी या भागात सन २०१५ ते २०१८ या दरम्यान अनेक निवासी संकुलांची उभारणी आमदार वैभव नाईक यांनी केली होती. यातील बांधकरवाडी येथील ‘दत्तकृपा’ अपार्टमेंटमधील ५६ फ्लॅट धारकांना रत्नागिरी एसीबीकडून चौकशीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. फ्लॅट धारकांनी हे फ्लॅट कसे खरेदी केले, त्याचा तपशील देण्याचे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच फ्लॅट ज्यांच्या नावे आहेत त्यांना आधार कार्ड, पॅनकार्ड सादर करण्याचेही कळविण्यात आले आहे.
कणकवलीत चौकशीची विनंती
दत्तकृपा अपार्टमेंटमध्ये अनेक वयाेवद्ध नागरिक आहेत. त्यांना चौकशीसाठी रत्नागिरी येथे जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे फ्लॅट खरेदीबाबतची चौकशी कणकवलीतच करावी अशी विनंती आम्ही एसीबीला केली अाहे. आत्ता आम्हा फ्लॅटधारकांना नोटिसा आल्या आहेत. तर ज्यावेळी चौकशी होईल त्यावेळी आम्ही एसीबीला पूर्ण सहकार्य करणार आहोत.
- सुरेश पवार, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी