
मुंबई : गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय कोकणात मुक्कामी जातात. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी राज्य शासनाने मुंबई ते (जयगड) रत्नागिरी आणि मुंबई ते (विजयदुर्ग) सिंधुदुर्ग रो-रो सेवा सुरू केली असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबई ते कोकण समुद्रामार्गे प्रवास करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रो-रो सेवेची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकणवासीयांना आणि पर्यटकांना या वाहतुक सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.
मंत्री श्री. राणे म्हणाले की, केंद्रीय शिपींग मंत्रालय आणि राज्याच्या बंदरे विभागाने या जलवाहतूक सेवेस अंतिम मंजूरी दिली आहे. या रो-रो सेवेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एकूण १४७ परवानग्या प्राप्त झाल्या असून, यामुळे कोकणवासीयांचा अतिशय सुरक्षित व जलद प्रवास होणार आहे. हवामानाच्या बदलामुळे मच्छिमारांनाही समुद्रात जाण्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याने हवामान सुरळीत होताच प्रत्यक्ष प्रवाशांसाठी ही रो-रो सेवा १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
भाऊचा धक्का ते जयगड तीन तास तर भाऊचा धक्का ते वीजयदुर्ग पाच तास प्रवास करता येणार आहे. येथे जेट्टीची सुविधा असून, जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बसेसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. २५ नॉट्स स्पीडची ही एम टू एम नावाची रो-रो बोट असणार आहे जी दक्षिण आशीयातील वेगवान बोट आहे. यामध्ये इकोनॉमी वर्गात ५५२ आसनांची व्यवस्था, प्रिमीयम इकोनॉमी मध्ये ४४, बिझनेस मध्ये ४८, तर फस्ट क्लासमध्ये १२ प्रवाशांची क्षमता असणार आहे. तर, ५० चार चाकी, 3० दुचाकी क्षमता असलेली ही रो-रो आहे.
यासाठी कोकणवासीयांना इकोनॉमी क्लाससाठी दोन हजार ५०० रूपये दर आकारला जाणार आहे. तर, प्रिमियम इकोनॉमीसाठी प्रवाशांसाठी चार हजार रूपये, बिझनेस क्लाससाठी सात हजार ५००, फस्ट क्लाससाठी नऊ हजार रूपये दर आकारला जाणार आहे. तसेच, चार चाकीसाठी ६ हजार दर, दु-चाकीसाठी एक हजार दर, सायकलसाठी ६०० दर, मिनी बससाठी १३ हजार आणि बसच्या आसनक्षमतेप्रमाणे दर वाढत जाणार आहेत. भविष्यात श्रीवर्धन, मांडवा असे विविध थांबे असणार आहेत तर त्यासाठी जेट्टीही तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री. राणे यांनी दिली.