महाबळेश्वर : बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ते अशी ही साताऱ्याची तऱ्हा आणि कृष्णा कोयनेच्या पवित्र संगमापासून ते भिलार-महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपर्यंत रंगतदार माहिती देत अतिशय खुमासदार शैलीत भाषण करत सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी अधिवेशनात उपस्थितांची भरभरून दाद मिळवली.
ते म्हणाले, सर्वात पहिल्याचा गोडवा वेगळाच असतो. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं देशपातळीवरच पहिलं अधिवेशन या भूमीत होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. पहिलं मौखिक, त्यानंतर लिखित, मुद्रित आणि सध्या डिजिटल या प्रवासात सातारा जिल्ह्याच्या या भूमीचं मोठं योगदान आहे. आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या निश्चितपणे मंत्री शंभूराज देसाई मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील.
आम्ही आक्रमक नाही प्रसारक आहोत, असं सांगत ते म्हणाले की, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते अगदी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत चांगले मुख्यमंत्री या भूमीन राज्याला दिले आहेत. या भूमीला मोठी परंपरा आहे. आपली सुरुवात या भूमीतून होते आहे, त्यामुळे आपल्या सर्वांच्या मागण्यांना निश्चितपणे पूर्ण होतील.