राज्याच्या आरोग्यसुविधांचा कायापालट होणार | आशियाई बँकेकडून 4100 कोटी वित्तीय सहाय्य

Edited by:
Published on: November 24, 2023 12:01 PM
views 241  views

मुंबई : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचेतसेच संलग्न रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आशियाई विकास बँकेने 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 4100 कोटी रुपये इतके वित्तीय सहाय्य करण्यास सहमती दर्शविली आहे. आशियाई डेव्हलपमेंट बँकेच्या बोर्डाने आज याला मंजुरी दिली.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सरकार आल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आशियाई विकास बँकेसोबत ७ नोव्हेंबर 2022 रोजी बैठक घेतली आणि या प्रस्तावाला गती दिली.

वर्ष 2030 पर्यंत राज्यात सर्वांच्या कक्षेत आणि परवडणार्‍या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात गुणवत्तापूर्ण सेवा देणारे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, हा या प्रकल्पाचा मुख्य गाभा असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गुणात्मक बदल आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा यातून मिळणार असल्यामुळे राज्यात वैद्यकीय क्षेत्रात लक्षणीय बदल घडून येतील. वैद्यकीय शिक्षणाच्या कक्षा रुंदावणे आणि अविकसित भागात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे, हेही यामाध्यमातून साध्य होणार आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.