'देवगड हापुस'ची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना !

नैसर्गिक संकटाशी झुंज देत शिंदे बंधूंनी केलं यशस्वी उत्पादन !
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 24, 2022 12:56 PM
views 4202  views

देवगड : एकीकडं निसर्गाची अवकृपा असतानाही या नैसर्गिक संकटाशी झुंज देत उत्पादीत केलेल्या, देवगड तालुक्यातील कातवणचे आंबा बागायतदार दिनेश शिंदे व प्रशांत शिंदे यांच्या बागेतून देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला देव दिवाळी व मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी रवाना करण्यात आली. या दोन डझनच्या पेटीला किती भाव येईल, याची उत्सुकता आहे, कारण या दरावरच पुढील हंगाम अवलंबुन असल्याचं जाणकारांचं मत आहे.  


कातवण येतील आंबा बागायतदार प्रशांत शिंदे व दिनेश शिंदे यांच्या गोरक्ष गणपती मंदिर या ठिकाणी असलेल्या घरानजीकच्या बागेत असलेल्या हापूसच्या कलमांना 15 ऑगस्ट पासूनच मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र काही कलमावरील आलेला मोहर गळून पडला. चार ते पाच कलमावरील मोहरा तसाच टिकून राहिला आणि तो टिकवण्यासाठी या शिंदे बंधूंनी खूप मेहनत घेतली. त्यामुळेच या चार कलमांवर मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढत देवगड हापूसची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी काढून शुभ मुहूर्त केला. त्यानंतर त्यापेटीची विधिवत पूजा करून ही पेटी वाशी येथे जाण्यासाठी रवाना झाली. स्वतः आंबा बागायतदार शिंदे ही आंबापेटी घेऊन वाशी मार्केटला रवाना झाले आहेत. या दोन डझनच्या आंबा पेटीला साधारणतः सात ते आठ हजारच्या आसपास भाव मिळेल, असा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.


यावर्षी आंबा सिझन पाहता अजूनही हापूसच्या कलमांना पालवीच येत आहे. मात्र अशावेळी  हापूसच्या कलमांची योग्य निगा राखत पहिली पेटी या दोन युवा आंबाबागायतदारांनी पाठविली आहे. ऋतुचक्रात वारंवार बदल होत असून देखील या दोन बंधूनी मोहोर टिकविण्यासाठी अत्यंत कष्ट घेतले. त्यावर आलेली आंबा पिकाची चव देखील स्वतः चाखून पहिली आणि त्या नंतरच उर्वरित आंबे काढत ही पेटी आज मार्गस्थ केली आहे. 

      ऋतुचक्रातील बदल असून देखील योग्य पद्धतीने आंबा पिकून त्याची स्वतः चव चाखून आपण पिकविलेल्या मालाचा दर्जा चांगला आहे की नाही हे शेतकऱ्यांनी पाहणे खूप गरजेचे असते. हे या  शेतकऱ्यांनी स्वतः पाहिल्यानेच आमदार नितेश राणे यांनी देखील शिंदे बंधूंचे कौतुक केले आहे.

यावेळी आंबा बागायतदार दीपकचंद्र शिंदे, दिनेश शिंदे, प्रशांत शिंदे ,नरेश डामरी, पप्पू लाड आदी उपस्थित होते.