सावंतवाडी : दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणजे सोनुर्लीची श्री देवी माऊलीचा उत्सव राज्यातच नव्हे, तर देशात प्रसिध्द आहे. सोनुर्लीची माऊली हि दक्षिण कोकणचे आराध्य दैवत म्हणून ओळखली जाते. देवीचा वार्षिक जत्रोस्तवास बुधवारी प्रारंभ झाला. पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक सोनुर्लीत दाखल झाले होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी लोटांगणाची जत्रा म्हणून या उत्सवाकडे पाहील जात. या उत्सवा निमित्त देवीच दर्शन घेण्यासाठी जिल्हासह, गोवा, कर्नाटक, मुंबई, कोल्हापूरसह अन्य राज्यातून लाखो भक्तगण दर्शनासाठी सोनुर्ली पंचक्रोशीत दाखल झाले. खणा नारळाने देवीची ओटी भरत लाखो भाविक माऊली चरणी लीन झाले.
मळगाव, सोनुर्ली या दोन गावांचे देवी माऊली दैवत असून दोन गावांच्या एकोप्याचे हे प्रतीक आहे. सायंकाळी मळगाव येथून तरंगकाठीचे आगमन होणार आहे. ढोल तशांच्या गजरात सोनुर्ली गावाच्या सीमेवर तरंगकाठीचे स्वागत होईल. तर रात्री ११ च्या सुमारास लोटांगण उत्सवास सुरूवात होणार असून हजारो भाविक यात सहभागी होणार आहेत. निर्जळ उपवासाच व्रत यासाठी केल जात. प्रथम पुरुषांची लोटांगण व त्यापाठोपाठ महिलांची लोटांगणे पार पडतील. अतिशय नियोजनबद्धरित्या हा कार्यक्रम पार पडतो. ज्या भक्तगणांची मनोकामना पूर्ण होते, ते भक्तगण लोटांगण घालत नवस फेडतात. कोरोना रूपी राक्षसाचा नायनाट कर असं साकडं माऊलीला भाविकांनी घातलं अन् कोरोनारुपी संकंट दूर झालं. जत्रोत्सवाचा हा सोहळा 'याची डोळा याची देही' पाहण्यासाठी लाखो भाविक आवर्जून उपस्थित राहतात.
जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तुळाभार केला जातो. देवीच्या चरणांकडे बोललेले नवस अथवा मनोकामना पूर्ण झाल्यानंतर तुळाभार केला जातो. देवीच्या मंदिरान घेतलेलं नव रूप भक्तांच्या डोळ्याच पारण फेडत. या जत्रोत्सवाला लाखो भाविकांचा जनसागर लोटतो. मंदिराला केलेली विद्युत रोषणाई डोळे दिपून टाकते. पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी जातीनीशी उपस्थित राहत कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखील माऊलीच दर्शन घेतल. हाकेला धावणाऱ्या..नवसाला पावणाऱ्या सोनुर्लीच्या श्री देवी माऊलीची ख्याती सर्वदूर पसरी असून लाखो भाविक श्रद्धेन देवीच्या चरणी लीन होत आहेत.