कोकणच्या महाचॅनेलचा दणका | बातमीनंतर तातडीनं सावित्री पूलाची दुरुस्ती सुरू !

पुलावर रस्त्याचे जॉईंट तुटल्याचं आणलं होतं उघडकीस
Edited by: नितेश लोखंडे
Published on: January 12, 2023 16:11 PM
views 195  views

रायगड : सावित्री पुलावर रस्त्याच्या मध्यभागी पुलाला जोडणारा लोखंडी चॅनेल तुटल्याने सावित्री पुल धोकादायक अवस्थेत असल्याची बातमी कोकणसाद LIVE ने प्रसारित केली होते. या बातमीची दखल राष्ट्रीय महामार्ग खात्याने घेऊन महामार्ग खात्याचे अधिकारी श्री महडकर यांनी सावित्री पुलावर प्रत्यक्षात भेट दिली. रस्त्यावरील एक्सपंशन  जॉईंट तुटले असल्याने त्याचं काम सुरू केले आहे. पुलावर काम सुरू असल्याने या ठिकाणी वाहतूक बंद ठेवण्यात आली असून पर्यायी वाहतूक बाजूच्या नवीन पुलावरून सुरू ठेवण्यात आली आहे. 

2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई - गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळून प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. आजही ही घटना आणि त्यानंतरचे शोध कार्य अंगावर शहारे आणते, या दुर्घटनेत जयगड - मुंबई व राजापूर- बोरिवली या दोन एसटी बस, एक तवेरा यासह 40 जणांना सावित्रीने आपल्या पोटात घेतले होते, त्यावेळेस फडणवीस सरकारने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता 165 दिवसांमध्ये नवीन पुल उभे केले परंतु संबंधित खात्याने या पुलाकडे दुर्लक्ष केल्याने आज पुल धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सावित्री पुलावरील मध्य भागात लोखंडी एक्सपंशन जॉईंटचे तुकडे झालेत. म्हणजेच या पुलावरील रस्त्याच्या कामाकडे देखील राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून दुर्लक्ष करण्यात आले होते.