अध्यापक विद्यालये बंद होणार नाहीत ; दर्जा वाढीची देणार संधी

विद्यार्थी, पालकांचा संभ्रम झाला दूर
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: April 21, 2023 10:26 AM
views 562  views

सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील अध्यापक विद्यालय अर्थात डीएड कॉलेजेस शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून बंद होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चेस पूर्णविराम मिळणार असल्याचे दिसते. कारण या संदर्भात अद्याप कोणताही शासन आदेश पारित झालेला नाही. मात्र शिक्षणशास्त्र अर्थात बीएड पदवीसाठी बारावीनंतर नवीन शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा अभ्यासक्रम शासकीय महाविद्यालयांमध्ये सुरू होणार आहे, असे नमूद केले आहे.

 राज्यातील सर्वच डी. एड. कॉलेजेस आगामी शैक्षणिक वर्षापासून बंद होणार असल्याची नाहक चर्चा विद्यार्थी व पालकांमध्ये सुरू होती. परंतु यासंदर्भात शासन स्तरावरून कोणतेही आदेश निर्गमित झालेले नाहीत. नवीन शैक्षणिक धोरणात डीएड कॉलेज २०२८ पर्यंत चालू राहतील आणि त्यानंतर त्यांचे रूपांतर बी.एड. मध्ये करण्याची संधी दिली जाणार आहे. याचा अर्थ डीएड महाविद्यालये बंद होतील, असा चुकीचा अर्थ घेतला गेला, असे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथील उपसंचालक माधुरी सावरकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल झोपे यांनी कोकणसादला दिली.

 तसेच गंगामाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नगाव जि. धुळे येथील प्राचार्य डॉ. एन. एम. पटेल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही अध्यापक विद्यालय बंद होण्याच्या संदर्भामध्ये कोणतेही शासन निर्णय निर्गमित झाले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच बारावी निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती अभावी उच्च शिक्षण घेणे परवडणारे नाही, त्यांच्यासाठी कमी खर्चात त्यांचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डीएड हाच एकमेव मार्ग असल्याचे नमूद केले.

"कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या अत्यंत साधारण परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे कमी खर्चात शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डीएड हाच एकमेव राजमार्ग आहे. मात्र अलीकडच्या काळात डीएड कॉलेजेस बंद होतील, अशी नाहक चर्चा होती. ज्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आता तो संभ्रम दूर झाला असून शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच डीएड शिवाय पर्याय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बारावी निकालानंतर अध्यापक विद्यालयाचे अर्ज सादर करावेत. जेणेकरून पुढील दोन वर्षात शिक्षक होऊन ते आपले यशस्वी जीवन जगू शकणार आहेत..!"

- प्राचार्य नेताजी कुंभार

मराठा विद्या मंदिर-

स. रा. देसाई अध्यापक विद्यालय, रत्नागिरी